प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोना पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याने अनलॉक 3.0 जारी करण्यात आला आहे. दरम्यान, संसर्ग सातत्याने कमी होत असल्याने राज्य सरकारने आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या मार्गसूचीनुसार वैद्यकीय, दंतवैद्यकीय, आयुष, नर्सिंग, हेल्थ केअर ऍकॅडमी आणि इतर आरोग्य कोर्स शिकविणारी महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांमध्ये नियमित वर्ग भरविता येणार आहेत.
राज्य महसूल खात्याचे मुख्य सचिव एन. मंजुनाथ प्रसाद यांनी शुक्रवारी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेतलेले विद्यार्थी, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचाऱयांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाविद्यालय आणि शिक्षण संस्थांनी कोविड-19 मार्गसूचीचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱया महाविद्यालयांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सरकारने दिला आहे.
राज्य सरकारने विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालये सुरू करण्यात येतील, असे सांगितले आहे. त्यानुसार राज्यभरात विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जात आहे. आता वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासंबंधीचे शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱयांनी किमान एक लस घेतली असेल तर त्यांना महाविद्यालयात थेट अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
जर महाविद्यालय प्रशासनाकडून कोरोना मार्गसूचीचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले तर डिसॉस्टर मॅनेजमेंट कायदा 2005 च्या सेक्शन 51 ते 60 अंतर्गत येणाऱया तरतुदींनुसार कारवाई केली जाईल. शिवाय भा. दं. वि. 188 नुसारही कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. त्यामुळे विद्यार्था, प्राध्यापक व इतर कर्मचाऱयांना मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, वैयक्तिक स्वच्छता, थर्मल स्क्रिनिंग व इतर नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. याशिवाय महाविद्यालय परिसराचे वेळोवेळी सॅनिटायझिंग करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र तपासूनच ऑफलाईन वर्गांसाठी प्रवेश दिला जाणार आहे