प्रतिनिधी /बेळगाव
वॉर्ड क्र. 4 व 7 या दोन्ही वॉर्डांमध्ये राष्ट्रीय पक्षांसोबतच अपक्ष मोठय़ा प्रमाणात होते. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने विजयी होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत या दोन्ही वॉर्डांतील मतदान केंद्रांवर चुरशीने मतदान झाले. अपक्षांची संख्या अधिक असल्याने प्रत्येक उमेदवाराची हुरहूर वाढली आहे.
वॉर्ड क्र. 4 मध्ये भाजप-काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांसोबतच आम आदमी पार्टी व 16 अपक्ष उमेदवार रिंगणात होते. महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवारांची संख्या ही याच वॉर्डात होती. त्यामुळे बेळगावमधील जनतेचे लक्ष या वॉर्डाकडे लागले होते. प्रत्येक उमेदवाराने कंबर कसून मागील काही दिवसात प्रचार केला होता. शनिवारी या वॉर्डसाठी मारुती गल्ली, केळकर बाग, गणपत गल्ली, भेंडीबाजार, कोनवाळ गल्ली या मतदान केंद्रांवर मतदान झाले. शहराच्या मध्यवर्ती भागात हा प्रभाग येत असल्याने शुक्रवारी सायंकाळपर्यंत मतदानासाठी चुरस दिसून आली. किरकोळ घटना वगळता शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली.
वॉर्ड क्र. 7 मध्ये एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या वॉर्डात मतदानाची चुरस वाढली होती. आपल्याला अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी प्रत्येक उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करीत होते. शुक्रवारी काकतीवेस रोड, गवळी गल्ली, केळकर बाग, रिसालदार गल्ली येथील जुनी महानगरपालिका इमारत या मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. कोणतेही वादावादीचे प्रकार न होता शांततेत मतदान पार पडले.