पांगुळ गल्लीत 30 व्यावसायिकांना महापालिकेकडून नोटीस जारी : 15 हजार 500 रुपये दंड वसूल, यापुढेही मोहीम सुरूच ठेवणार
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार विनापरवाना व्यावसायिकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्हा पालकमंत्र्यांच्या दौऱयामुळे गुरुवारी ही मोहीम थांबविण्यात आली होती. मात्र विश्रांतीनंतर शुक्रवारपासून मोहीम राबवून पांगुळ गल्ली परिसरातील 30 व्यावसायिकांना नोटीस जारी करण्यात आली. तसेच 15 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला.
व्यवसाय परवाना घेण्याची सूचना महापालिकेने केली होती. मात्र याकडे व्यावसायिकांनी दुर्लक्ष केले आहे. काही व्यावसायिकांनी वर्षांनुवर्षे विनापरवाना व्यवसाय थाटला असल्याचे निदर्शनास आले आहे. वास्तविक पाहता अशा व्यावसायिकांकडून दंड वसूल केल्यास 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत जातो. मात्र महापालिकेकडून चौकशीनंतर 1 ते 3 वर्षांपर्यंतच्या व्यवसाय परवान्याची फी दंड म्हणून वसूल करण्यात येत आहे. मात्र दंड भरण्यास व्यावसायिकांकडून विरोध होत आहे. इतकी वर्षे विनापरवाना व्यवसाय करूनही दंड भरण्यास नकार देण्यात येत आहे. पण महापालिकेकडून दंडाची नोटीस बजाविण्यात येत आहे.
विनापरवाना व्यावसायिकांची संख्या जास्त असल्याने तपासणी करण्याची सूचना आयुक्तांनी केली होती. त्यानुसार चार दिवसांपासून मोहीम हाती घेतली आहे. पण गुरुवारी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ बेळगाव दौऱयावर असल्याने व्यवसाय परवाना तपासणी मोहीम थांबविण्यात आली होती. मात्र शुक्रवारपासून विनापरवाना व्यावसायिकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
7 दिवसांत व्यवसाय परवाना घेण्याची सूचना
पांगुळ गल्ली परिसरात व्यावसायिकांकडे परवान्याची विचारणी केली असता, अनेक व्यावसायिकांकडे परवाना नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना नोटीस बजावून 7 दिवसांत व्यवसाय परवाना घेण्याची सूचना करण्यात आली. तसेच वर्षांनुवर्षे विनापरवाना व्यवसाय करणाऱयांकडून 15 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. विनापरवाना व्यावसायिकांचा शोध घेण्याची मोहीम यापुढे सुरूच ठेवण्यात येणार आहे. या मोहिमेवेळी आरोग्य निरीक्षक संतोष कुरबेट, श्रवण कांबळे, सावंत यांच्यासह मनपाचे कर्मचारी सहभागी होते.