देनांग शहरात पुन्हा निर्बंध लागू : आरोग्य प्रशासन सतर्क : जगभरात 1 कोटी 62 लाख 26 हजार 400 कोरोनाबाधित
जगभरात आतापर्यंत 1,62,26,400 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 99 लाख 28 हजार 637 बाधितांना संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे. तर 6 लाख 48 हजार 865 बाधित दगावले आहेत. व्हिएतनाममध्ये तीन महिन्यांनी पहिला कोरोनाबाधित आढळून आला आहे. देनांग शहरातील 57 वर्षीय व्यक्तीला ता प आणि श्वसनावेळी त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्याचा कोरोना चाचणी अहवाल होकारात्मक आला आहे.संबंधिताला कोरोनाची लागण कशामुळे झाली हे समजू शकलेले नाही.
आरोग्य कर्मचाऱयांनुसार बाधित महिन्याभरापासून स्वतःच्या शहरातच होता. बाधित आढळताच देनांग शहरात पुन्हा टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. आवश्यक कामांसाठीच घरातून बाहेर पडा असे लोकांना सांगण्यात आले आहे.
नेतान्याहू विरोधात निदर्शने
इस्रायलमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण 60 हजारांपेक्षा अधिक झाले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे लोकांमध्ये नाराजी आहे. जेरूसलेम समवेत देशाच्या अनेक शहरांमध्ये लोकांनी पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह निदर्शने केली आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यास नेतान्याहू यांना अपयश आल्याचा आरोप निदर्शकांनी केला आहे. इस्रायलमध्ये नेतान्याहू यांच्या विरोधात मागील आठवडय़ापासून आतापर्यंत तीनदा निदर्शने झाली आहेत. कोरोनाशी संबंधित उपाययोजनांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोपही नेतान्याहू यांच्यावर होत आहे.
मास्क नसल्यास दंड
इटलीत मास्क परिधान न केलेल्या लोकांवर 1,150 डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. कँपेनिया भागात 3 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर इशचिया आयलँडच्या तीन रेस्टॉरंट्समध्ये मास्कशिवाय दिसून आलेल्या लोकांवरही कारवाई करण्यात आली आहे. इटलीत कँपेनियामध्ये चालू आठवडय़ात सर्वाधिक रुग्ण आढळल्याने स्थानिक प्रशासनाने दंड ठोठावण्याचा आदेश काढला होता.
जर्मनी : 305 नवे रुग्ण
जर्मनीत मागील 24 तासांमध्ये 305 नवे रुग्ण समोर आल्याने एकूण संख्या 2 लाख 06 हजार 332 झाली आहे. देशातील बळींचे प्रमाण 9,202 झाल्याची माहिती रॉबर्ट कोच इन्स्टीटय़ूटने रविवारी दिली आहे. महामारीच्या प्रारंभापासून आतापर्यंत जर्मनीत 1 लाख 90 हजार 600 बाधितांना संसर्गापासून मुक्ती मिळाली आहे.
वाणिज्यमंत्र्याला कोरोनाची लागण
दक्षिण आफ्रिकेचे वाणिज्यमंत्री इब्राहिम पटेल यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची बाधा होणारे देशाचे ते चौथे मंत्री ठरले आहेत. इब्राहिम यांची प्रकृती ठिक असून कोरोना संसर्ग झाल्याचे समजताच ते स्वंय विलगीकरणात गेले आहेत. घरातूनच ते स्वतःचे कामकाज हाताळणार आहेत. मंत्र्याच्या संपर्कात आलेले लोकही विलगीकरणाचे पालन करत आहेत. सर्वांना स्वतःची चाचणी करवून घेण्यास सांगण्यात आल्याची माहिती कॅबिनेटच्या प्रवक्त्या फुमला विलियम्स यांनी दिली आहे.
मेक्सिकोत संकट गडद
कोरोना संकटाने मेक्सिकोच्या एका स्टील प्रकल्पातील 21 कर्मचाऱयांचा मृत्यू ओढवला आहे. मृतांमध्ये कर्मचाऱयांसह काही कंत्राटदार आणि पुरवठादारांचाही समावेश आहे. मेक्सिकोत जूनपासून अचानकपणे नवे रुग्ण वाढू लागले आहेत. देशात आतापर्यंत 3,85,036 बाधित सापडले असून 43,374 जणांचा मृत्यू झाला आहे.
नेपाळ : 18 हजार रुग्ण
नेपाळमध्ये मागील 24 तासांमध्ये 109 नवे बाधित सापडले आहेत. देशातील रुग्णांची संख्या आता 18 हजार 483 वर पोहोचली आहे. तेथील भोजपूर, पंचचर, संखुवासभा, रसुवा, मनांग आणि मस्टँग जिल्हय़ात आता एकही सक्रीय रुग्ण नाही. रौतहत, कैलाई आणि बजुरा जिल्हय़ात 500 पेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत.
उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला रुग्ण
महामारीच्या 7 महिन्यांनी संक्रमित आढळला : हुकुमशहा किमकडून शहरात आणीबाणी लागू
कोरोना महामारी सुरू झाल्याच्या सुमारे 7 महिन्यांनी उत्तर कोरियात कोरोना संसर्गाचा पहिला संशयित रुग्ण आढळला आहे. हुकुमशहा किम जोंग उनने दक्षिण कोरियाला लागून असलेल्या कीसॉन्ग शहरात टाळेबंदी लागू करण्याचा आदेश दिला आहे. तर संशयित रुग्ण फरार नागरिक असल्याचा दावा स्थानिक प्रसारमाध्यमांनी केला आहे. तो तीन वर्षांपूर्वी उत्तर कोरियातून पळाला होता. तर 19 जुलै रोजी अवैध मार्गाने सीमा ओलांडून देशात पोहोचला होता.
उत्तर कोरियाचा हुकुमशहा किमने पॉलिट ब्युरोची तातडीची बैठक बोलावली होती. बैठकीत कीसॉन्ग शहरात आणीबाणी लागू करण्यासह उच्चस्तरीय दक्षतेचे उपाय योजण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेजारी देश चीनमध्ये संसर्ग फैलावल्यावर उत्तर कोरियाने मोठी सतर्कता बाळगली होती. किम यांनी देशाच्या सर्व सीमा बंद केल्या होत्या. राजधानी प्योंगयांगमध्ये काम करणाऱया सर्व अधिकाऱयांना एक महिन्याचे विलगीकरण अनिवार्य करण्यात आले होते.
महामारीचा फटका
महामारीपासून वाचण्यासाठी सर्वप्रथम पावले उचलणाऱया जगाच्या निवडक देशांमध्ये उत्तर कोरियाचा समावेश आहे. देशाची अर्थव्यवस्था चीनमधून होणाऱया व्यापारावरच अवलंबून आहे. तरीही उत्तर कोरियाने कोरोनाचा धोका पाहता चीनशी होणारा व्यापार पूर्णपणे रोखला होता. या निर्णयामुळे उत्तर कोरियाची आर्थिक स्थिती डगमगली आहे. उत्तर कोरियातील आरोग्य सुविधा अन्य देशांच्या तुलनेत फारशी चांगली नाही.
इजिप्तमधील संसर्ग घटला
इजिप्तमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे. दिवसभरात तेथे कोरोना संसर्गाचे 511 नवे रुग्ण सापडले आहेत. देशात सलग 17 व्या दिवशी नव्या रुग्णांचे प्रमाण 1 हजारापेक्षा कमी राहिले आहे. 19 जून रोजी तेथे 1,774 नवे बाधित सापडले होते, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते खलिद मगहद यांनी दिली आहे. याचदरम्यान इजिप्तमध्ये दिवसभरात 933 बाधितांना संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे. देशात आतापर्यंत 4,558 बळी गेले असून 91 हजार 583 बाधित सापडले आहेत.