9916 मतदान : आज मतमोजणी
प्रतिनिधी / फोंडा
राज्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशा व्हीपीके अर्बन सहकारी पतसंस्थेच्या नूतन संचालक मंडळासाठी रविवारी निवडणूक होऊन 9916 मतदारांनी मतदान केले. सर्व बाराही तालुक्यांमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वाधिक 3861 मतदान फोंडा तालुक्यात तर सर्वात कमी 148 धारबांदोडा तालुक्यात झाले.
व्हीपीकेचे संचालक हिरु खेडेकर यांचे व्हीपीके सहकार परिवर्तन पॅनल व त्यांच्या विरोधात अध्यक्ष डॉ. सुर्या गावडे पॅनल अशी दोन पॅनल रिंगणात होती. दोन्ही पॅनलमध्ये प्रत्येकी 11 उमेदवारांचा समावेश असून त्यांचे भवितव्य आज ठरणार आहे.
मतमोजणी आज सोमवार 19 रोजी सकाळी 9 वा. पासून कुर्टी-फोंडा येथील सहकार भवनमध्ये होणार असून दुपारपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. व्हीपीके संस्थेच्या राज्यभरात 40 शाखा असून साधारण 1 लाख 5 हजार मतदार आहेत. प्रत्यक्षात 9916 मतदारांनी मतदान केले.
सहकार परिवर्तन पॅनलचे दुर्गादास लाडू गावडे, आनंद बाबल केरकर, दिना बेतू बांदोडकर, चिराग यशवंत गावडे, हेमंत दत्ता गावडे, रामा उर्फ सूर्या जयवंत गावडे, सूर्यकांत पुरुषोत्तम गावडे, हिरु शाणू खेडेकर, सावित्री रामदास वेलिंगकर, ऍड. सुषमा जानू गावडे व रोहिदास अंतुलो गावडे तर डॉ. सुर्या गावडे यांच्या पॅनलमध्ये शशिकांत रामा बोरकर, चंद्रकांत बाबया गावडे, सुभाष शंकर गावडे, सुर्या सदाशिव गावडे, महेश गणेश खेडेकर, समीर पुंडलिक खेडेकर, रोहिदास फोंडू प्रियोळकर, श्याम सदा सांगोडकर, पूनम राजीव फडते, रोशन चंद्रकांत गावडे, पांडुरंग शंकर गावडे यांचा समावेश आहे.