एजीआर प्रकरण : ‘दूरसंचार’ला थकबाकीची मूळ रक्कम पूर्णपणे अदा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दूरसंचार विभागाला समायोजित सकल महसूल (एजीआर) च्या थकबाकीबाबत अतिरिक्त 3,354 कोटी रुपये दिले आहेत, असे दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडियाने सोमवारी सांगितले. एजीआर थकबाकीची मूळ रक्कम पूर्णपणे भरली आहे. या देयकामुळे कंपनीने आत्तापर्यंत एजीआर थकबाकीपोटी सरकारला 6,854 कोटी रुपये दिले आहेत, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
दूरसंचार विभागाने व्होडाफोन-आयडियाकडे एजीआर थकबाकीसाठी 53 हजार कोटी रुपयांची मागणी केली असून, व्याज, दंड तसेच रक्कम देण्यास उशीर केल्यामुळे त्यावरील व्याज यांचाही यामध्ये समावेश आहे. दरम्यान, कंपनीने एजीआर देयचा अहवाल 6 मार्च रोजी दूरसंचार विभागाला सादर केला आहे. कंपनीने यापूर्वी एजीआर थकबाकीसाठी 17 फेब्रुवारीला 2,500 कोटी रुपये आणि 20 फेब्रुवारीला 1000 कोटी रुपये दिले होते.
व्होडाफोनचे सीईओ निक रीड यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री रविशंकर यांची एजीआरच्या मुद्दयावर भेट घेतली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कंपनी थकबाकी भरण्यास असमर्थ असल्याचे दर्शवत रीड यांनी मंत्र्यांसमोर दिलासा मागितला होता. याशिवाय कंपनीला भारतात नवीन आणि चांगली सुरुवात करायची आहे, असेही त्यांनी म्हटले होते.
…तर सेवा देखील बंद होतील
व्होडाफोन-आयडिया सध्या आयसीयूमध्ये आहे. सरकारकडून एजीआरच्या रकमेमध्ये दिलासा मिळाला नाही तर त्याचा परिणाम अधिक दिसून येईल. याशिवाय सेवा देखील बंद केल्या जाऊ शकतात. कंपनीच्या तिसऱया तिमाही आकडेवारीसह निक रीड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.