शासनाकडून मिळणार ‘स्मार्ट अंगणवाडी कीट’
प्रतिनिधी / ओरोस:
जिल्हय़ातील 100 अंगणवाडय़ांना शासनाकडून ‘स्मार्ट अंगणवाडी कीट’ पुरविली जाणार आहेत. त्यामुळे या कीट उपलब्ध असणाऱया अंगणवाडय़ा आता आदर्श अंगणवाडय़ा म्हणून ओळखल्या जाणार आहेत.
जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा सभापती शर्वाणी गावकर यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै समिती सभागृहात झाली. यावेळी समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, सदस्य सायली सावंत, श्वेता कोरगावकर, महिला व बालविकास अधिकारी विनीत म्हात्रे, सर्व तालुक्यांचे बालविकास प्रकल्प अधिकारी, अन्य विभागांचे अधिकारी खातेप्रमुख आदी उपस्थित होते.
2021-22 या आर्थिक वर्षात 3720 अंगणवाडय़ांना राज्य शासनाकडून स्मार्ट अंगणवाडी कीट पुरविली जाणार आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 100 अंगणवाडय़ांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती अमोल पाटील यांनी दिली. स्मार्ट कीटचे साहित्य पार्ट अ आणि ब अशा दोन भागात पुरविले जाणार आहेत. अ भागात सोलर लायटिंग सिस्टिम, एज्युकेशन पेंटिंग, प्रिंटिंग चार्टस, ई-लर्निंग, डेस्क प्लोअर सिटिंग, स्वच्छ भारत कीट, ऑफलाईन वॉटर प्युरिफायर, हॅन्डवॉश बेसिन फॅसिलिटी इत्यादींचा समावेश आहे. तर ब भागात अंगणवाडीची रंगरंगोटी, तसेच किरकोळ दुरुस्ती केली जाणार आहे.
5 जुलै रोजी शासनाने याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे अंगणवाडी निवडीचे काम सुरू असून स्मार्ट कीटच्या पुरवठय़ानंतर या अंगणवाडय़ा आदर्श अंगणवाडय़ा म्हणून ओळखल्या जाणार आहेत, असे स्पष्ट केले.
भाग्यश्री योजनेंतर्गत दोन मुलींनंतर एकवर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱया व्यक्तीला 25 हजार रुपयांची ठेव पावती शासनाकडून करून दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ठेवण्यात आलेली एक वर्षाची मुदत ही अपुरी आहे. अनेक वेळा मुलाबाबतचा निर्णय हा कुटुंबातील अन्य सदस्यांवरही अवलंबून राहतो. त्यामुळे या योजनेच्या लाभाचा कालावधी दोन वर्षे करण्यात यावा, असा ठराव शासनाला पाठविण्याचे आदेश सभापती सौ. गावकर यांनी दिले. अंगणवाडीमधून होणारी मुलांची आरोग्य तपासणी कोविडमुळे थांबली असल्याचे सांगत सभापती गावकर यांनी नाराजी व्यक्त केली. मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याने या मुलांच्या तपासण्या करण्याबाबत आरोग्य विभागाला सुचित करण्याचे आदेश दिले.