ऑनलाईन टीम / मुंबई :
दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी 23, 24 व 25 जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे होणाऱ्या शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे देखील सहभागी होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
यावेळी मलिक यांनी या मागची पक्षाची भूमिकाही स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी कायद्यांना विरोध केला असून शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेला आहे. आता या आंदोलनात महाविकास आघाडी मधील तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेते व स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा सहभागी होणार आहेत, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे ऐकले पाहिजे. कठोर भूमिका सोडून चर्चेतून तीढा सोडवला पाहिजे, असे मत या आधीच शरद पवार यांनी मांडलेले आहे. आता तर पवार थेट आंदोलनातच उतरत असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.