प्रतिनिधी / बेंगळूर
तामिळनाडूतील एआयएडीएमकेच्या माजी नेत्या शशिकला नटराजन कोरोनामुक्त झाल्या असून रविवारी त्यांना बेंगळूरच्या व्हिक्टोरिया इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर समर्थकांनी इस्पितळाबाहेर त्यांच्या पुष्पवृष्टी करून स्वागत केले. याप्रसंगी चेन्नईच्या आर. के. नगरचे आमदार टीटीव्ही दिनकरन उपस्थित होते. दरम्यान, थेट चेन्नईला न जाता शशिकला यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बेंगळूरमध्येच 10 दिवस क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे.
बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणी चार वर्षांचा कारावास पूर्ण केल्यानंतर 27 जानेवारी रोजी शशिकला यांची परप्पन अग्रहार कारागृहातून मुक्तता करण्यात आली होती. मात्र, कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांच्यावर 20 जानेवारीपासून त्यांच्यावर बेंगळुरातच उपचार करण्यात येत होते. त्यामुळे कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर देखील त्यांना चेन्नईला जाणे शक्य झाले नव्हते. आता इस्पितळातून डिस्चार्ज मिळाल्याने त्या देवनहळ्ळी विमानतळाजवळील प्रेस्टीज गोल्फ रिसॉर्टमध्ये 10 दिवस वास्तव्य करणार आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या येथे क्वारंटाईन होणार आहेत.
रविवारी दुपारी 12 वाजता शशिकला नटराजन यांना डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी इस्पितळाबाहेर चाहते आणि समर्थकांनी गर्दी केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव इस्पितळापासून 50 मीटर अंतरापर्यंत बॅरिकेड्स लावण्यात आले होते.