बेळगाव / प्रतिनिधी
शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते बंद आहेत. काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. परिणामी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरांतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग शोधावे लागत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
चन्नम्मा सर्कलपासून आरटीओ सर्कलकडे जाणाऱया रस्त्यावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. सतत गजबजलेल्या प्रमुख रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याची बाब ठरत आहे. सोमवारी सकाळी या रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयापासून आरटीओ सर्कलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाल्याने वाहनधारकांना बाहेर पडताना कसरत करावी लागली.
शहरातील कॉलेज रोड, चन्नम्मा सर्कल, बसस्थानक मार्ग, सर्किट हाऊस मार्ग, काँग्रेस रोड, क्लब रोड, जुना पी. बी. रोड, आंबेडकर मार्ग आदी ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे यातील काही मार्ग बंद आहेत तर काही मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनधारकांची चांगलीच दमछाक होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांचे काम सुरू असल्याने इतरत्र मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यामुळे काही वेळेला वाहतूक कोंडी होताना दिसून येत आहे.