विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
शहर परिसरात मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध मंदिरांतून हर हर महादेवचा गजर होणार आहे. विशेषतः शिवमंदिरांतून धार्मिक पूजा, शिव नामस्मरण, शिवभजन, पारायण, जागर यासह इतर कार्यक्रम होणार आहेत.
शहरातील मिलिटरी महादेव मंदिर, कपिलेश्वर मंदिर, शहापूर मुक्तीधाम, गोवावेस पंचवटी रिक्षा स्टॅन्ड, शिवमंदिर, खासबाग शिवमंदिर, शनिवार खुट महादेव आर्केड, शहापूर खडेबाजार, गणेशपूर, अयोध्यानगर, आनंदनगर, विजयनगर, शाहूनगर आदी ठिकाणी असणाऱया शिवमंदिरांतून कार्यक्रम होणार आहेत. याकरिता शिवमंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
श्री महादेव आर्केड मंडळ
शनिवार खुट येथील श्री महादेव आर्केड महाशिवरात्री उत्सव मंडळातर्फे मंगळवारी मंदिरात सकाळी 11 ते 2 या वेळेत लघुरुद्राभिषेक व शिवपंचायतन याग करण्यात येणार आहे. बुधवारी 1 ते 3 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व शिवभक्तांनी सहभागी व्हावे, असे कळविण्यात आले आहे.
बसव कॉलनी
बसव कॉलनी येथील बसवाण्णा देवस्थान जन्मोत्सव समितीतर्फे श्री बसवाण्णा देवस्थानात मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी पूजा-अर्चा व अभिषेक होणार आहे. बुधवारी रुद्राभिषेक व इतर कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिवगिरी मंदिर
पाईपलाईन रोड, विजयनगर येथे सालाबादप्रमाणे शिवरात्रीनिमित्त शिवगिरी श्री शिवमंदिरात मंगळवार दि. 1 रोजी सकाळी 11.30 वाजता महारुद्राभिषेकाचे आयोजन केले आहे. सकाळी 6 वाजता लघुरुद्र व रात्री 10 वाजल्यापासून नामस्मरण व भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 12 वाजता यामपूजा आयोजित केली आहे. समस्त शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे मंदिराचे व्यवस्थापक पी. सी. कोकीतकर यांनी कळविले आहे.
बेकीनकेरेत धार्मिक कार्यक्रम
बेकीनकेरे येथील महाशिवरात्री उत्सव मंडळातर्फे मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री नागनाथ मंदिरात अभिषेक व पूजाअर्चा केली जाणार आहे. तसेच भजन मंडळाचा जागर भजनाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी सकाळी महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.