ओम नमःशिवायचा गजर : दर्शनासाठी भाविकांची मध्यरात्रीपासूनच वर्दळ
प्रतिनिधी /बेळगाव
हर हर महादेव, ओम नमःशिवायच्या गजरात बुधवारी शहर परिसरात महाशिवरात्री उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने शिवमंदिरांतून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पहाटेपासून मंदिरांतील शिवलिंगांवर लघुरुद्र अभिषेक व पूजा-अर्चा झाली. शिवाय भजनासह भावगीते आणि भक्तिगीतांचे सांस्कृतिक कार्यक्रमही झाले. कोरोनामुळे मागील दोन वर्षात महाशिवरात्री उत्सव साधेपणात झाला होता. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महाशिवरात्री उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा झाला. दर्शनासाठी मंदिरांतून गर्दी झाली होती. काही मंदिरांच्या समोर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. बुधवार दि. 2 रोजी काही मंदिरांतून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील कपिलेश्वर मंदिर, मिलिटरी महादेव मंदिर, शहापूर मुक्तीधाम, गोवावेस पंचवटी रिक्षास्टॅन्ड शिवमंदिर, शनिवार खूट महादेव आर्केड, नेहरूनगर बसवाण्णा महादेव मंदिर, केएलई शिवालय मंदिर, वीरभद्रनगर वीरभदेश्वर मंदिर, कॅम्प बिस्कीट महादेव मंदिर, एपीएमसी बसवेश्वर मंदिर यासह परिसरातील इतर मंदिरांतून महाशिवरात्री उत्साहात झाली.
कपिलेश्वर मंदिर
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱया श्री कपिलेश्वर मंदिरात मंगळवारी महाशिवरात्री उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सोमवारी रात्री विशेष रुद्राभिषेक करण्यात आला. हा अभिषेक समस्त बेळगावातील नागरिकांसाठी विश्वस्त मंडळाकडून घालण्यात आला. मंदिरात रात्रभर विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. मंगळवारी मंदिरात त्रिकाल पूजा झाली. मंदिरामध्ये रात्रीपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या. मंदिर समितीने गडबड गोंधळ टाळण्यासाठी रांगेत दर्शन घेण्याची सोय केली होती. सुरक्षा रक्षकही नेमण्यात आले होते. विशेष म्हणजे मंदिराच्या बाजूस असणाऱया तलाव परिसरात राधाकृष्ण, भक्त प्रल्हाद यांच्यासह विविध ऐतिहासिक व पौराणिक देखावे सादर करण्यात आले होते. बुधवार दि. 2 रोजी महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे.
एपीएमसी रोड, श्री बसवेश्वर मंदिर
एपीएमसी रोड येथील श्री बसवेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंगावर फुलांची आरास करण्यात आली होती. मंदिरात पहाटे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले होते.
नेहरूनगर श्री बसवाण्णा महादेव मंदिर
नेहरूनगर येथील श्री बसवाण्णा महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्साहात पार पडली. पहाटे मंदिरात रुद्राभिषेक आणि पूजा-अर्चा झाली. दिवसभर मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी वर्दळ वाढली होती. सायंकाळी सिद्धकला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. बुधवार दि. 2 रोजी दुपारी 12.30 वाजता महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
केएलई शिवालय मंदिर
केएलई रोड येथील शिवालय मंदिरात मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. पहाटे मंदिरात महारुद्राभिषेक, पूजा-अर्चा झाली. त्यानंतर अलंकार, श्रीगंध अलंकार झाला. यावेळी केएलई संस्थेचे प्रभाकर कोरे यांनीही उपस्थिती दर्शविली. सायंकाळी साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
वीरभद्रनगर येथील वीरभदेश्वर मंदिर
वीरभद्रनगर पोलीस हेडक्वॉर्टर्स येथील वीरभदेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्साहात पार पडली. सकाळी मंदिरात रुद्राभिषेक आणि पूजा-अर्चा झाल्यानंतर पालखी सोहळा झाला. मंदिरातून पालखी सोहळय़ाला सुरुवात होऊन कपिलेश्वर मंदिर येथे पोहोचली. त्यानंतर पुन्हा पालखी वीरभदेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाली. सायंकाळी मंदिर परिसरात रथोत्सव कार्यक्रम झाला. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटक सादर झाले. यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
कॅम्प श्री शंभू जत्ती मंदिर (बिस्कीट महादेव)
कॅम्प येथील श्री शंभू जत्ती (बिस्कीट महादेव) मंदिरात मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रम झाले. पहाटे 4 वाजता रुद्राभिषेक, लघुरुद्राभिषेक, उसाच्या रसाचा अभिषेक, पंचामृत अभिषेक व त्यानंतर सत्यनारायण पूजा झाली. सायंकाळी दीपालंकार, पुष्पालंकार झाला. पौरोहित्य रवांद्र भट व सहकाऱयांनी केले.
वाडा कंपाऊंड, वडगाव
वाडा कंपाऊंड वडगाव येथील शिवमंदिरात महाशिवरात्री साजरी झाली. पहाटे मंदिरात रुद्राभिषेक आणि गणहोम झाला. बुधवारी दुपारी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
नार्वेकर गल्ली, ज्योतिर्लिंग देवस्थान
नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. रात्री 1 वाजता लघुरुद्राभिषेक झाला. जागर कार्यक्रमाबरोबर केदार कवच व नामस्मरण झाले. पहाटे 4 वाजता काकडारती व इतर पूजा-अर्चा झाली.
पौरोहित्य सचिन जोशी यांनी केले. देवाला 51 लीटर दुग्धाभिषेक करून आरती करण्यात आली. भाविकांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.
पाटील गल्ली, श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिरात 1 हजार 1 शिवलिंगांवर अभिषेक
पाटील गल्ली येथील श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी मंदिरात कोटी लिंगार्चन, महाभिषेक व आरती झाली. विशेष म्हणजे 1 हजार 1 शिवलिंगांचा महाअभिषेक करण्यात आला. रात्री 9 वाजता दुग्धाभिषेक झाला.
शनिवार खूट महादेव आर्केड
शनिवार खूट महादेव आर्केड येथे महाशिवरात्री उत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रम झाले. सकाळी 11 ते 2 या वेळेत लघुरुद्राभिषेक, शिवपंचायतन याग झाला. होमहवन राजन गायडोळे दाम्पत्याच्या हस्ते झाले. अभिषेक प्रमोद उबाळे दाम्पत्याच्या हस्ते झाला. बुधवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
शहापूर मुक्तीधाम स्मशानभूमी
शहापूर मुक्तीधाम स्मशानभूमी येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री भक्तिभावाने साजरी झाली. मध्यरात्री आणि पहाटे अभिषेक, पूजा, आरती झाली. त्यानंतर दिवसभर प्रसादाचे वितरण करण्यात आले. दरवषीप्रमाणे स्मशानभूमीत भारतनगर येथील भक्ती महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी शहापूर, वडगाव, हिंदवाडी, आनंदवाडी, खासबाग परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
शहापूर आचार्य गल्ली लोकमान्य श्रीराम मंदिर
शहापूर आचार्य गल्ली, गाडेमार्ग येथील लोकमान्य श्रीराम मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंगाची पूजा झाली. हभप वैजनाथ उचूकर यांच्या हस्ते पंचाभिषेक व रुद्राभिषेक करण्यात आला. शिवलिंगावर बेल आणि फुलांची आरास करण्यात आली होती. शिवाय महिला मंडळाच्यावतीने राम नाम व ओम नमः शिवायचा जप करण्यात आला. दरम्यान खासबाग, पाटील गल्ली येथील वारकरी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी अध्यक्ष लक्ष्मण बन्नार, कुशल नार्वेकर, लव महाराज नार्वेकर, ज्ञानेश्वर काकडे आदी उपस्थित होते.
शिवबसवनगर जोतिबा देवालय
शिवबसवनगर येथील जोतिबा देवालयात महाशिवरात्रीनिमित्त जोतिबाची श्री महादेवाच्या रुपात विशेष पूजा झाली. पुजारी लक्ष्मण बुणे यांनी पूजन केले. पहाटे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. येथे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
अनगोळ कलमेश्वर मंदिरात महाशिवरात्र
अनगोळ येथील ग्रामदेवता श्री कलमेश्वर मंदिर येथे महाशिवरात्र उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. कलमेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच मंदिर परिसरात संपूर्ण तयारी झाली होती.
मंगळवारी पहाटेही मंदिराचे पुजारी तसेच शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवपिंडीची मंत्रोच्चाराच्या उद्घोषात पूजेला सुरूवात झाली. शिवपिंडीवर दूध, तूप, दही, पाणी, चंदनाचा लेप तसेच पंचामृतांनी अभिषेक घालण्यात आला. शिवभक्तांच्यावतीने देण्यात आलेल्या अभिषेकाच्या साहित्याचा वापर यासाठी करण्यात आला.
याचबरोबर इतर देवदेवतांची पूजा करुन उत्सवाला सुरूवात झाली. दर्शनासाठी गावातील नागरिक, महिला आणि अबालवृध्दांनी गर्दी केली होती. सायंकाळीदेखील विधीवत पूजा करण्यात आली. गावावरील सर्व संकटे दूर कर, आम्हाला यश दे, उत्तम आरोग्य लाभो, कोरोनाचे संकट दूर होवो यासाठी गाऱहाणे घालण्यात आले. यावेळी मोठय़ा संख्येने भाविक, मंदिर कमिटीचे समस्य उपस्थित होते.
अनगोळ येथील रामलिंग मंदिरात महाशिवरात्री उत्साहात
मारुती गल्ली, अनगोळ येथील रामलिंग मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी झाली. पहाटे मंदिरात अभिषेक घालण्यात आला. पूजा-अर्चा व आरती करून खिचडीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.