प्रतिनिधी / मडगाव
भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या व गोव्यातील प्रसिद्ध देवस्थानात गणती होत असलेल्या फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळळीकरीणीच्या जत्रोत्सवाला आज सोमवार दि. 18 पासून सुरवात होत आहे. यंदा कोरोना महामारीमुळे मर्यादित प्रमाणात कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून जत्रोत्सव साजरा केला जाणार आहे. महामारीच्या छायेखाली होणाऱया यंदाच्या जत्रोत्सवाला मर्यादा आल्या असल्या तरी भक्तांच्या उत्साहावर परिणाम होणार नाही.
सोमवार दि. 18 जानेवारी पासून जत्रोत्सवाला सुरवात होत असून शनिवार दि. 23 पर्यत विविध धार्मिक कार्यक्रमा नुसार जत्रोत्सव साजरा केला जाणार आहे. सोमवार दि. 18 रोजी सकाळी धार्मिक विधी संपन्न झाल्यावर बारा गावकर नमनाला बसणार आहेत. रात्रौ देवीची पालखी मिरवणूक व जागर होणार आहे. मंगळवार दि. 19 रोजी सकाळी धार्मिक विधी, देवीला महाभिषेक अर्पण केला जाणार आहे. रात्रौ दहा वाजता देवीची अंबारी रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. बुधवार दि. 20 रोजी धार्मिक विधी, महाभिषेक व जागर संपन्न झाल्यावर देवीची फुलांच्या रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.
गुरुवार दि. 21 रोजी देवी विजयरथावर विराजमान होणार असून उपस्थित भक्त देवीची विजयरथातून मिरवणूक काढणार आहेत. शुक्रवार दि. 22 रोजी सकाळी धार्मिक विधी जागर व इतर विधी संपन्न झाल्यावर शनिवार दि. 23 रोजी पहाटे सहा वाजता देवीची महारथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.
जत्रोत्सवाला प्रत्येक वषी मोठी फेरी भरत होती. जत्रोत्सवाला भेट देणारे भक्त देवीच्या स्थळातील एखादी वस्तू हमखास खरेदी करायचेत. मात्र यंदा कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करताना फेरी थाटण्यात येणार नसून जत्रोत्सवाचा भाग म्हणून काही पारंपारिक खाज्याचे मांड, फुले व केळी विपेते व अबीर गुलालाच्या मांडाना व पारंपारिक लाकडी वस्तुंच्या दालनालाच परवानगी देण्यात आलेली आहे.
श्री शांतादुर्गा कुकळळीकरिण देवस्थान हे एक जागृत देवस्थान म्हणून गोव्यात प्रसिद्ध आहे. मागणीची देवी व नवसाला पावणारी देवी म्हणून कुंकळळीकरीणीची ख्याती असून देवीचे भक्त जत्रोत्सवाला देवीचे दर्शन घेण्यास हमखास उपस्थिती लावतात.
दरम्यान, देवीला अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तुंचा लिलाव जत्रोत्सवाची सांगता झाल्यावर 24 जानेवारी पासून होणार आहे.