मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाकडून महापौरांना निवेदन
सांगली : प्रतिनिधी
शामरावनगर येथील दफनभूमीची जागा मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाकरीता तात्काळ हस्तांतरण करा, अशा मागणीचे निवेदन मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाकडून महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शामरावनगर येथील ख्रिश्चन दफनविधी आणि मुस्लिम कब्रस्थानच्या संदर्भात सध्या उलट सुलट चर्चा सुरु आहे. शहरात मुस्लिम समाजाची लोकसंख्या जवळपास एक लाखापर्यंत आहे. त्याकरीता फक्त दोनच कब्रस्थान सध्या आहेत. एक कर्नाळ रोड व मार्केट यार्ड परिसरात आहे. ही दोन कब्रस्थाने सध्या अपुरे पडत आहेत. त्याकरीता समाजातील नेते, कार्यकर्ते यांनी शामरावनगर येथील जागेवर महापालिकेत ठराव करुन मंजूर करून आरक्षण घेतले असून आणि ती जागा अगदी योग्य आहे. सदरचा भाग हा विस्तारित असल्याने या परिसरात शहराच्या मानाने अधिक मुस्लिम आणि ख्रिचन समाज आहे. मुस्लिम समाजाला मार्केट यार्ड व कर्नाळ रोड वरील कब्रस्थान सोयीचे नाहीत.
यासाठी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने व काँग्रेसचे ताजुद्दीन शेख यांच्या वतीने महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्ष नेते संजय मेंढे, गट नेते मैनुद्दीन बागवान यांना निवेदन देण्यात आले. तात्काळ या जागेचा ताबा कायदेशीरपणे समाजाच्या ताब्यात देण्यात यावा, अन्यथा लोकशाही पध्दतीने हक्कासाठी अंदोलने करावी लागतील, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी काही समाजसेवकांनी सदर जागा पुराने बाधित होते, त्यामुळे देण्यात येऊ नये अशी मागणी देखील केली आहे. ही मागणी चुकीची आहे. कारण पुराच्या पाण्याचा सातत्याने त्रास हा कर्नाळ दफनभूमीला आहे. त्यामुळे हा मुद्दा दिशाभूल करणारा ठरतो. तरी या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन तात्काळ शामरावनगरची जागा मुस्लिम बांधवाकडे हस्तातरित करुन मिळावी अशी विनंती करण्यात आली आहे.
यावेळी मोहम्मद इसाक जित्तिकर, अझहर मुजावर, राजूभाई तांबोळी, तय्यब अन्सारी, सलाउद्दीन नदाफ, अकतर आत्तार, नजीर मुजावर, याकूब मनेर, खुदबुद्दीन मुजावर, शामरानगर, १०० फुटी रोड, हनुमाननगर, रामनगर आदि परीसरातील नागरिक उपस्थित होते.