ऑनलाईन टीम / पुणे :
स्वच्छता कर्मचा-यांकरीता अनेक कायदे आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका यांचे अनुदान व योजना आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी तेवढया प्रमाणात होत नाही. स्वच्छता कर्मचाऱ्यांची मुले चांगल्या पद्धतीने शिकली, तर त्यांची परिस्थिती सुधारेल. त्यामुळे शारिरीक श्रम करणाऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी पुण्यामध्ये वेगळा ट्रस्ट स्थापना व्हावा, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मित्र परिवारतर्फे मोदी सरकारच्या दुसऱ्या सत्रातील वर्षपूर्तीनिमित्त नारायण पेठेतील गोगटे प्रशालेच्या प्रांगणातून शहराच्या मध्यवस्तीत काम करणाऱ्या पुणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा स्वच्छता सुरक्षा किट देऊन गौरव करण्यात आला. सुमारे 1 हजार 500 जणांना टप्याटप्याने हे स्वच्छता सुरक्षा किट देण्यात येणार आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूरामध्ये आम्ही संवेदना ट्रस्टच्या माध्यमातून कष्टकऱ्यांच्या 300 मुलींचे शिक्षण करीत आहोत. आमचा प्रयत्न 3 हजार मुलींना शिक्षण देणे, असा आहे. कष्टकऱ्यांच्या मुली शिकल्या, तर कुटुंब अधिक सक्षम होतील. त्यामुळे त्यांची जबाबदारी आपण घ्यायला हवी. पुणेकरांच्या आरोग्यासाठी झटणारी ही कष्टकरी मंडळी आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्य व कुटुंबाला सक्षम करण्याकरीता आपण पुढे यावे.