पहिली कसोटी तिसरा दिवस ; दोघांचीही पहिली अर्धशतके
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
भारताचे पहिले सहा फलंदाज केवळ 186 माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाला चौथ्या व शेवटच्या कसोटीच्या पहिल्या डावात मोठी आघाडी मिळणार असे वाटत असतानाच पदार्पणवीर वॉशिंग्टन सुंदर व दुसरी कसोटी खेळणारा शार्दुल ठाकुर या मुख्यतः गोलंदाज असलेल्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली आणि भारताला सुस्थिती प्राप्त करून देताना वैयक्तिक अर्धशतकांसह झुंजार शतकी भागीदारीही नोंदवली. ही भागीदारी नोंदवताना त्यांनी अनेक विक्रमही नोंदवले. भारताचा पहिला डाव 336 धावांत आटोपल्यानंतर तिसऱया दिवशीअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱया डावात 6 षटकांत बिनबाद 21 धावा जमविल्या होत्या. त्यांची आघाडी आता 54 धावांची झाली आहे. त्यांच्या हॅझलवुडने भारताचे 5 बळी मिळविले.
2 बाद 62 या धावसंख्येवरून पुजारा व रहाणे यांनी तिसऱया दिवसाच्या खेळास पुढे प्रारंभ केला आणि भारताचे शतक पूर्ण झाल्यानंतर प्रथम पुजारा 25 धावा काढून बाद झाला. रहाणे मोठी खेळी करणार असे वाटत असताना तो उपाहाराच्या ठोक्यालाच 37 धावांवर बाद झाला. त्याला दोन जीवदाने मिळाली होती, पण त्याचा त्याला लाभ घेता आला नाही. पुजारा व रहाणे यांनी 43 धावांची भागीदारी केली. दुसऱया सत्रात हॅझलवुडने मयांक अगरवाल (38), पंत (23) यांना बाद करून भारताला बॅकफूटवर आणले होते. चहापानाच्या सुमारास भारत अद्याप 116 धावांनी पिछाडीवर होता. अगरवाल बाद झाल्यावर रिषभ पंत विचित्र फटका मारत बाद झाल्याने भारताची 6 बाद 186 अशी स्थिती झाली होती आणि भारतीय शेपूट झटपट गुंडाळून मोठी आघाडी घेण्याचे मनसुबेही ऑस्ट्रेलियाने रचले होते. पण वॉशिंग्टन सुंदर व शार्दुल ठाकुर हे अनपेक्षितपणे भारताचे तारणहार ठरले आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाचे मनसुबे साफ उधळून लावले.
शार्दुल-सुंदरची झुंज
शार्दुल व सुंदर यांनी प्रारंभी सावध फलंदाजी केली. चहापानानंतरच्या सत्रात शार्दुल ठाकुरने प्रतिहल्ला करीत दर्जेदार ऑस्ट्रेलियन माऱयाची धुलाई केली. शार्दुलने तर अग्रमानांकित वेगवान गोलंदाज कमिन्सला हुकचा षटकार ठोकूनच धावांची सुरुवात केली होती. दोघांनीही परिणामाचा विचार न करता बिनधास्त फटकेबाजी केली आणि पहिली कसोटी अर्धशतकेही नोंदवली. शार्दुलने लियॉनला षटकार ठोकूनच अर्धशतकी मजल मारली. हॅझलवुडने त्याला त्रिफळाचीत करून त्याची आक्रमक खेळी संपुष्टात आणली. त्याने 115 चेंडूत 9 चौकार, 2 षटकारांसह 67 धावा फटकावल्या आणि सुंदरसमवेत सातव्या गडय़ासाठी 123 धावांची भागीदारी केली. पहिली कसोटी खेळणाऱया सुंदरनेही नंतर अर्धशतक (62) पूर्ण केले. त्याच्या 144 चेंडूंच्या खेळीत 7 चौकार, एका षटकाराचा समावेश होता. ऑस्ट्रेलियात पदार्पणाच्या कसोटीत 3 बळी व अर्धशतक नोंदवणारा गेल्या 74 वर्षातील तो पहिला विदेशी क्रिकेटपटू बनला आहे. त्यावेळीही (1947-48) भारताच्याच दत्तू फडकरने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 51 धावा व 14 धावांत तीन बळी मिळविले होते. याशिवाय सुंदरने ऑस्ट्रेलियात पदार्पणात वैयक्तिक सर्वोच्च खेळी करण्याचा विक्रमही केला. 110 वर्षापूर्वी इंग्लंडच्या प्रँक फॉस्टरने नोंदवलेला 56 धावांचा विक्रम त्याने मागे टाकला. तसेच गब्बा मैदानावर पदार्पणात 100 हून अधिक चेंडूंचा सामना करणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याचा मानही त्याने मिळविला आहे.
ऑस्ट्रेलियातील कसोटीत भारतातर्फे सातव्या गडय़ासाठी नोंदवलेली ही चौथी शतकी भागीदारी आहे. यापूर्वी पंत व जडेजा यांनी 204 (2018-19), विजय हजारे-हेमू अधिकारी यांनी 132 (1947-48), मोहम्मद अझहरुद्दिन-मनोज प्रभाकर यांनी 101 (1991-92) अशा शतकी भागीदारी भारतातर्फे नेंदवल्या आहेत. याशिवाय सुंदर-शार्दुलने सातव्या गडय़ासाठी नोंदवलेली 123 धावांची भागीदारी ही ब्रिस्बेनवरील भारताची सर्वोच्च भागीदारी आहे. हा विक्रम नोंदवताना त्यांनी कपिलदेव-मनोज प्रभाकर यांचा 58 धावांचा विक्रम मागे टाकला. सुंदर-शार्दुल यांनी नोंदवलेल्या या झुंजार भागीदारीचे अनेक माजी क्रिकेटपटूंनी कौतुक केले आहे. नवदीप सैनी, सुंदर, सिराज लवकर बाद झाल्याने भारताचा डाव 336 धावांत संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाला केवळ 33 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियातर्फे हॅझलवुडने भेदक मारा करीत 57 धावांत 5 बळी मिळविले. कमिन्स, स्टार्क यांनी प्रत्येकी 2, लियॉनने एक बळी मिळविला.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 6 षटकांच्या खेळात बिनबाद 21 धावा जमवित आपली आघाडी 54 धावांची केली आहे. हॅरिस 1 तर वॉर्नर 3 चौकारांसह 20 धावांवर खेळत आहेत.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया प.डाव 369, भारत प.डाव 111.4 षटकांत सर्व बाद 336 ः रोहित शर्मा 44, गिल 7, पुजारा 25 (94 चेंडूत 2 चौकार), रहाणे 37 (93 चेंडूत 3 चौकार), अगरवाल 38 (75 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), पंत 23 (29 चेंडूत 2 चौकार), वॉशिंग्टन सुंदर 62 (144 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), शार्दुल ठाकुर 67 (115 चेंडूत 9 चौकार, 2 षटकार), सैनी 5 (14 चेंडूत 1 चौकार), सिराज 13 (10 चेंडूत 2 चौकार), नटराजन नाबाद 1, अवांतर 14. गोलंदाजी ः हॅझलवुड 5-57, स्टार्क 2-88, कमिन्स 2-94, लियॉन 1-65, ग्रीन 0-20). ऑस्ट्रेलिया दु.डाव 6 षटकांत बिनबाद 21 ः हॅरिस खेळत आहे 1, वॉर्नर खेळत आहे 20.
ऑस्ट्रेलियात सातव्या गडय़ासाठी नेंदवलेल्या भारतीय भागीदारी
भागीदारी फलंदाज केंद्र वर्ष
204 रिषभ पंत-रवींद्र जडेजा सिडनी 2019
132 विजय हजारे-हेमू अधिकारी ऍडलेड 1948
123 शार्दुल ठाकुर-वॉशिंग्टन सुंदर ब्रिस्बेन 2021
101 अझहरुद्दिन-मनोज प्रभाकर ऍडलेड 1992.