विद्यागमला स्थगिती दिल्याने सुटीचा आदेश जारी
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या संकटकाळात देखील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी विद्यागम प्रणाली अवलंबविण्यात आली. यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांची दसरा सुटी रद्द करण्यात आली होती. मात्र विद्यागम कार्यक्रमाला देण्यात आलेल्या तात्पुरत्या स्थगितीमुळे 12 ते 30 ऑक्टोबर दरम्यान दसरा सुटी जाहीर केली आहे. यामुळे मागील दोन-तीन महिन्यांपासून विद्यागमअंतर्गत परस्परांशी जोडले गेलेले शिक्षक-विद्यार्थी यांना 20 दिवसांची दसरा सुटी मिळणार आहे. यामुळे शिक्षकांसाठी खुल्या झालेल्या शाळा वीस दिवसांसाठी बंद राहणार आहेत.
विद्यागमनुसार अध्यापन-अध्ययनात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे विद्यागम प्रणालीला स्थगिती देऊन दसरा सुटी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे कोरोनाच्या छायेत देखील शिक्षकीसेवा बजाविणाऱया शिक्षकांना तात्पुरता दिलासा लाभला आहे. रोज शाळेत वेळेत हजर राहणे व विद्यागमप्रणालीची अंमलबजावणी शाळा स्तरावरून करण्याबाबतचा आदेश आल्याने जून महिन्यापासून शिक्षक ऑनडय़ुटी आहेत. शाळेत येणे आणि दररोजच्या नियोजनानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची प्रक्रिया पार पाडली जात असल्याचे दिसून येत आहे.
नियोजित वेळापत्रकानुसार दसऱयाची सुटी 3 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान 20 दिवसांची निर्धारित करण्यात आली होती. मात्र विद्यागम सुरू ठेवण्याच्या उद्देशाने सुटी रद्द करण्यात आली होती. अखेर विद्यागमला स्थगिती दिल्याने सुटीचा आदेश जारी केला असून आजपासूनच दसरा सुटी मिळणार आहे.
आदेशाचे पालन करण्यात येईल : आण्णाप्पा पॅटी (शिक्षणाधिकारी)
दसऱयाची सुटी दि. 12 ते 30 ऑक्टोबर दरम्यान असून या कालावधीत विद्यागम प्रणाली बंद राहणार आहे. विद्यागमला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून पुढील आदेशानुसार सुटीनंतरची वाटचाल ठरणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात टिकवून ठेवण्यासाठी विद्यागम योजना लाभदायक होती. मात्र सध्या शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करण्यात येईल, असे मत आण्णाप्पा पॅटी यांनी व्यक्त केले.