परशुराम उपरकरांनी व्यक्त केली खंत : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडरेशनतर्फे विविध व्यावसायिकांचा गौरव
कणकवली:
पर्यटनाला वाव असतानादेखील शासनकर्त्यांच्या उदासीन धोरणामुळे जिल्हय़ात पर्यटन बहरू शकले नाही. पर्यटन जिल्हय़ाला पर्यटन अधिकारी नाही. सिंधुदुर्गात जे पर्यटन वाढत आहेत ते केवळ स्थानिक पर्यटन व्यावसायिकांमुळे. या व्यावसायिकांना पाठबळ देण्याऐवजी त्यांची विविध गोष्टींमध्ये अडवणूक करण्याचे काम शासनाकडून केले जात आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन संकल्पना राबविल्या पाहिजेत. जिह्यातील पर्यटनाच्यावृद्धीसाठी पर्यटन क्षेत्रात काम करणाऱयांना सर्वतोपरी सहकार्य करेन, अशी ग्वाही माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडरेशनतर्फे कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडरेशनतर्फे पर्यटन क्षेत्रातील विविध व्यावसायिकांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपरकर बोलत होते. नगराध्यक्ष समीर नालवडे, प्रा. हरिभाऊ भिसे, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, सचिव नितीन तळेकर, खजिनदार यशवंत आमोनिकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उपरकर म्हणाले, पर्यटन क्षेत्रातून अनेकांना रोजगार मिळू शकतो. पर्यटनावर आधारित अनेक प्रकल्प जिल्हय़ात राबविले पाहिजेत. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळे हे प्रकल्प राबविले गेले नाहीत. त्यामुळे जिल्हा पर्यटन क्षेत्रात मागे गेला आहे. जिल्हय़ात येणाऱया पर्यटकांसाठी मूलभूत सुविधाही उपलब्ध नसल्याने पर्यटक जिल्हय़ातील पर्यटन स्थळे पाहण्याकडे पाठ फिरवत आहेत. कोरोनामुळे दीड वर्षे व्यावसायिकांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. आता कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर पर्यटक जिल्हय़ातील पर्यटन स्थळांना भेट देऊ लागले आहेत. याचा फायदा व्यावसायिकांनी घेऊन त्यांना दर्जेदार सुविधा द्याव्यात. जेणेकरून पुन्हा पर्यटनाला चालना मिळेल.
समीर नलावडे म्हणाले, कणकवली नगरपंचायत देखील पर्यटनवाढीसाठी पर्यटन महोत्सव आयोजित करत असते. पर्यटनाला चालना मिळण्यासाठी विविध पर्यटन विषयक उपक्रम जिह्यात राबविले पाहिजेत. गोवा पर्यटनाच्या दृष्टीने पुढे गेला आहे. त्या तुलनेत आपला जिल्हा मागे राहिला आहे.
प्रा. हरिभाऊ भिसे यांनी जिल्हय़ात पर्यटनवाढीसाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यक आहेत, याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडरेशनतर्फे सिंधुदुर्ग टुरिझम पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. बेस्ट ग्रो टुरिझम पुरस्कार ‘मामाचो गाव’चे मालक अनंत सावंत, बेस्ट हॉटेल टुरिझम पुरस्कार हॉटेल साई सुरभीचे मालक विजय गावडे, सावंतवाडी बेस्ट फूड टुरिझम पुरस्कार आरेकर्स रेस्टॉरंटचे मालक नीलेश आरेकर, बेस्ट सर्व्हिसेस टुरिझम पुरस्कार ग्रीन ग्रास रिसॉर्टचे मालक विष्णू चव्हाण, बेस्ट सर्व्हिसेस टुरिझम पुरस्कार दादा वेंगुर्लेकर बीच हाऊसचे मालक हरिश्चंद्र वेंगुर्लेकर, बेस्ट हॉस्पिटय़ालिटी टुरिझम पुरस्कार वृंदावन रेसिडेन्सी न्याहारी व निवासचे हेमंत चोपडेकर, बेस्ट इको टुरिझम ऍण्ड व्हिडिओग्राफी पुरस्कार कोकणी रानमाणूस इको टुरिझमचे प्रसाद गावडे, बेस्ट बॅकवॉटर टुरिझम पुरस्कार महालक्ष्मी वॉटर स्पोर्ट्सचे राजन कुमठेकर, बेस्ट गाईड टुरिझम पुरस्कार गणेश टुरिझम गाईड सर्व्हिसचे गणेश पाडगावकर, बेस्ट मेडिकल टुरिझम पुरस्कार आजोळ ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय पर्यटन केंद्राचे डॉ. विवेक रेडकर, बेस्ट साहस शौर्यवीर पुरस्कार मालवण आपत्कालीन ग्रुप मालवण बंदर जेटी, मालवण संस्थेला देण्यात आला.
मान्यवरांचे स्वागत चंद्रशेखर उपरकर, नितीन तळेकर, यशवंत आमोनीकर यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रशेखर उपरकर यांनी केले. आभार यशवंत आमोनीकर यांनी केले.
गणपती साना येथे धबधब्याची निर्मिती
कणकवली नगरपंचायतीतर्फे गणपती साना येथे भव्य असा धबधबा निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे पर्यटकांना वर्षा पर्यटनासाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था, फेडरेशन अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांना कोणतीही मदत लागली तर आपण करण्यास तयार आहोत. त्याचप्रमाणे जागतिक पर्यटन दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सर्वच राजकीय पक्षांच्या पुढाऱयांनी एकत्र येऊन पर्यटक क्षेत्राशी निगडित असलेल्या व्यापाऱयांना मदत करावी व पर्यटनाला चालना द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.