नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी बुधवारी बूस्टर डोसबाबत कोणताही निर्णय शास्त्रीय संशोधनानंतरच घेतला जाईल, असे स्पष्ट केले. कोरोनाच्या संसर्गामध्ये आणि व्हेरियंटमध्ये होणारे बदल आम्ही अतिशय काळजीपूर्वक पाहत आहोत. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोना नेहमीच सौम्य लक्षणांसह येतो. मात्र, काही काळात त्यात बदल होत जातात. साहजिकच भारतालाही परिस्थितीनुरुप निर्णयांमध्ये सुधारणा करावी लागेल, असे पॉल यांनी सांगितले. यापूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनीही संसदेत अशाचप्रकारे स्पष्टीकरण दिले होते. दुसरीकडे, ओमिक्रॉन अधिक संसर्गजन्य आहे. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, ओमिक्रॉनमध्ये फक्त सौम्य लक्षणे दिसत आहेत. गंभीर आजाराची अद्याप कोणतीही चिन्हे नाहीत. आम्हाला यावर अधिक डेटा हवा आहे. जसजशी प्रकरणे वाढतात तसतसे आम्हाला त्याच्या लक्षणांबद्दल अधिक माहिती मिळेल. लसीचा डोस मिळणे आणि कोविडच्या नियमांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. ज्यांनी लसीकरण केलेले नाही त्यांनी लवकर डोस घ्यावा, असे आवाहन एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केले आहे.