बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा खुलासा : प्रशांत किशोर यांना इशारा
वृत्तसंस्था/ पाटणा
मागील काही काळापासून एनआरसी तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याप्रकरणी केंद्र सरकारच्या विरोधात बोलणारे संजद नेते प्रशांत किशोर यांच्यासंबंधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. प्रशांत किशोर यांना पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह यांच्या शिफारसीवरच घेण्यात आला होता. स्वतःची इच्छा असेपर्यंत पक्षात रहा, असे म्हणत नितीश यांनी प्रशांत किशोर यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
एखाद्याच्या ट्विटशी संजदचा संबंध नाही. संजद वेगळा असून यातील सदस्य सर्वसामान्य आहेत. हा मोठय़ा लोकांचा पक्ष नसला तरीही आम्ही सर्वांचा आदर करतो, असे म्हणत नितीश यांनी प्रशांत किशोर यांच्या ट्विटवर स्पष्टीकरण दिले आहे.
अमित शाह यांच्या शिफारसीमुळेच प्रशांत किशोर यांना पक्षात घेतले. त्यांची इच्छा असेपर्यंत या पक्षात राहू शकतील, तसेही ते अन्य पक्षांसाठी काम करत आहेत. पक्षात राहू किंवा बाहेर पडू इच्छित असल्यास संजदचा आक्षेप नसल्याचे नितीश यांनी म्हटले आहे.
बिहारमध्ये भूमिका मांडणार
नितीश कुमार यांच्या विधानावर प्रशांत किशोर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितीश यांनी म्हणणे मांडले असून आता त्यांनी माझ्या भूमिकेची प्रतीक्षा करावी. बिहारमध्ये येऊन यावर बोलणार असल्याचे प्रशांत यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारला विरोध
नितीश कुमार यांचा संजद सद्यकाळात भाजपसोबत आघाडी करून बिहारमध्ये सरकार चालवत आहे. तर पक्षाचे नेते प्रशांत किशोर हे सातत्याने केंद्र सरकारच्या निर्णयांवर टीका करू लागले आहेत. प्रशांत यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे राजकीय रणनीतिकार म्हणून काम हाती घेतले आहे.