प्रतिनिधी/ बेळगाव
शिक्षक मतदार यादीच्या गोंधळामुळे निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. शिक्षक संघटनेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच शिक्षकांची लगबग सुरू झाली होती. मात्र, कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने शिक्षक संघ निवडणूक कार्यक्रमाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. यामुळे निवडणुकीची उत्सुकता लागलेल्या शिक्षकांची निराशा झाली असून पुढील तारखेची वाट पाहावी लागणार आहे. संघटनेचे सदस्य असूनही मतदार यादीत नाव नसल्याने मतदार यादीत गोंधळ झाला आहे, अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे गेल्याने निवडणूक स्थगित करण्यात आल्याचा आदेश बजाविण्यात आला आहे.
शनिवारी निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने पूर्वीच्या नियोजित कार्यक्रमामुळे बेळगाव शहर विभागातून सत्तेवर असणाऱया प्रगतीपरमधून 20 तर गुरुस्पंदनमधून 20 असा अर्जांचा भरणा करण्यात आला आहे. 14 जागांसाठी सदर निवडणूक होणार आहे. रविवार दि. 29 ही अर्ज पडताळणी व अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. मात्र, स्थगितीमुळे सदर प्रक्रिया थांबली आहे. यामुळे पुढील निवडणूक कार्यक्रम नेमका केव्हा जाहीर होणार, याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
2020-25 या कालावधीसाठी सदर पंचवार्षिक निवडणूक होणार होती. 6 डिसेंबर रोजी शहर-तालुका विभागाची निवडणूक पार पडणार होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळीला सुरुवात झाली होती. गाठीभेटी, प्रचारसभा, बैठका यांच्या माध्यमातून उमेदवारांकडून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू होती. यामुळे निवडणूक चांगलीच रंगणार असल्याची चर्चा होती. मात्र, मतदार यादीतील गोंधळामुळे लगबग मंदावली आहे. यामुळे पुढील निवडणूक कार्यक्रम केव्हा जाहीर होणार, याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.