प्रादेशिक आयुक्तांचे शिक्षकांना आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार संघातील मतदार याद्यांमध्ये नावे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी उत्तर व पश्चिम शिक्षक मतदार संघातील मतदारांनी आपली नावे 6 नोव्हेंबरच्या आत नोंद करावी, असे आवाहन प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांनी केले आहे.
बेळगाव, बागलकोट आणि विजापूर जिल्हय़ातील मतदारांनी याचा लाभ घ्यावा, आपली संपूर्ण माहिती 19 क्रमांक अर्जावर भरून द्यावी, असे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे. शिक्षक मतदार संघातील निवडणुकीपूर्वी नव्याने मतदार याद्या तयार केल्या जातात. यावेळीही त्या मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत. तरी ज्यांची नावे नाहीत तसेच नव्या मतदारांनी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही प्रकारची खोटी माहिती देऊन दिशाभूल करू नये, अशी व्यक्ती आढळल्यास संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले. शिक्षक मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी किमान तीन वर्षे शिक्षक म्हणून काम केले पाहिजे. त्यानंतरच संबंधितांचे नाव या मतदार यादीमध्ये नोंद केले जाणार आहे. शिक्षक असल्याच्या प्रमाणपत्रावर संस्थेच्या प्रमुखाची स्वाक्षरी असली पाहिजे, असेही म्हटले आहे.
पोस्टाने अथवा वैयक्तिकरित्या मतदन नोंदणी अधिकारी, साहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी यांच्याकडे हे अर्ज पाठवू शकतात. हे अर्ज देताना संपूर्ण कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. कोणतीही व्यक्ती आणि खोटी माहिती दिल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले असून मतदारांनी आपली नावे नोंदवावीत, असे प्रादेशिक आयुक्त अम्लान बिस्वास यांनी स्पष्ट केले आहे.