प्राचार्य रमणलाल शहा यांचे प्रतिपादन; डॉ. रा. भा. देवस्थळी पुरस्काराचे वितरण
कराड/ प्रतिनिधी
कोणत्याही क्षेत्रात तन्मयतेने काम करण्यासाठी समाजाला योग्य दृष्टी, दिशा देऊन संपन्न करणे हे शिक्षकाचे काम आहे. हे काम करण्यास शिक्षण मंडळ ही संस्था शिक्षकांना मोकळीक देते. यामुळे शिक्षकांच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो. शतकपूर्ती करणाऱया शिक्षण मंडळाचे हे कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार ख्यातनाम लेखक, ज्योतिषज्ञ, प्राचार्य रमणलाल शहा यांनी काढले,
शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या गुरूगौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्थापत्यविभाग प्रमुख डॉ. माधव कुमठेकर, शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती,
ते पुढे म्हणाले, ज्याप्रमाणे कुंभार मडकी घडवतो, त्याप्रमाणे अनेक शिक्षित पिढय़ांची निर्मिती करणे ही शिक्षकाची जबाबदारी आहे. त्यासाठी शाळा व कॉलेज ही ज्ञानाची केंद्रे झाली पाहिजेत. आपण शिक्षक असल्याचा अभिमान बाळगून काम करण्याची गरज आहे. डॉ. माधव कुमठेकर यांनी ज्या संस्थेने मला घडवले, त्या संस्थेचा पुरस्कार मिळतोय याचा आनंद असल्याचे सांगितले.
कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेल्या वर्षीचा गुरुगौरव समारंभ होऊ शकला नाही. त्यामुळे 2020 व 2021 या दोन वर्षांचा पुरस्कार वितरण सोहळा एकत्रितपणे साजरा करण्यात आला. प्राचार्य रमणलाल शहा, डॉ. माधव कुमठेकर यांना डॉ. रा. भा. देवस्थळी स्मृती शैक्षणिक पुरस्काराने बाळासाहेब कुलकर्णी व चंद्रशेखर देशपांडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
श्रीनिधी एज्युकेशन सोसायटी साताराचे अमित कुलकर्णी यांना डॉ. रा.गो. प्रभुणे अमृतमहोत्सवी शिक्षण संस्थाभूषण पुरस्काराने तर डॉ. राजाराम कुंभार कराड यांना डॉ. रा. गो. प्रभुणे अमृतमहोत्सवी गौरव ग्रंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अस्मिता पोतदार, प्रशांत दिवेकर, सुरेखा महिशी, अनघा परांडकर, डॉ. मधुरा जगताप, हेमंत देशपांडे, प्रशांत कुलकर्णी, विष्णू कुलकर्णी, किसन वाघमारे, चंद्रकांत काळे, स्नेहल वाळिंबे, अविनाश भांदिग्रे, गणेश इनामदार, प्रकाश वाघमारे, रोहिणी चव्हाण, अथर्व जोशी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सचिव चंद्रशेखर देशपांडे मनोगत व्यक्त केले. सुवर्णा देशपांडे व जीवन थोरात यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव राजेंद्र लाटकर यांनी आभार मानले.