अनगोळ केंद्रात रोज 50 लस पुरवठा : मात्र 200 हून अधिक नागरिक रांगेत
प्रतिनिधी /बेळगाव
सध्या कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे. शहरातील विविध आरोग्य केंद्रांमध्ये गर्दी वाढत आहे. पण विविध ठिकाणी राबविण्यात येणाऱया लसीकरण शिबिरांमुळे आरोग्य केंद्रांना मुबलक लस पुरवठा होत नाही. त्यामुळे दररोज 50 तर काही दिवस लस पुरवठाच होत नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सध्या कोरोना डेल्टा व्हेरियंटमुळे नागरिकांमध्ये धास्ती वाढली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिक धावपळ करू लागले आहेत. आरोग्य खात्याने यापूर्वी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. पण लसचा पुरवठा वेळेत होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनगोळ येथील आरोग्य केंद्रात दररोज केवळ 50 लस पुरवठा करण्यात येत आहेत. पण लस घेण्यासाठी 200 हून अधिक नागरिक दाखल होत आहेत. पण कधी कधी आरोग्य खात्याकडून लस पुरवठा केली जात नाही. त्यामुळे सकाळी सातपासून रांगेत थांबणाऱया नागरिकांची गैरसोय होत आहे. काहीवेळा अधिकारी व नागरिकांमध्ये वादावादीच्या घटनादेखील घडत आहेत.
सध्या 500 हून अधिक ठिकाणी लस देण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राला लसचा ठराविक साठा उपलब्ध होत आहे. सध्या सुरू असलेल्या लसीकरण शिबिरांमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. मिळेल त्या ठिकाणी लस घेण्यासाठी नागरिक घाई करत आहेत. लस मोफत असल्याने सर्वांना मिळणारच आहे. त्यामुळे सहकार्य करावे, असे आवाहनदेखील करण्यात येत आहे.