क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव फार्मा युनिट संघटना व युनायटेड क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरजिल्हा फार्मा चषक निमंत्रितांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत शिरसी फार्मा संघाने हुबळी फार्मा संघाचा 6 गडय़ांनी पराभव करून फार्मा चषक पटकाविला.
बेळगाव येथील गुडशेफर्ड, आरपीडी व जैन स्कूल मैदानावर ही स्पर्धा घेण्यात आली होती. फार्मा चषक क्रिकेट स्पर्धेत विजापूर, धारवाड, हुबळी शिवमोगा, रायचूर, शिरसी, कुलबुर्गी व बेळगाव येथील फार्मा संघानी भाग घेतला होता. उपांत्य सामन्यात शिरसी संघाने धारवाड संघाचा 5 गडय़ानी तर हुबळी संघाने बेळगाव संघाचा 3 गडय़ानी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात हुबळी संघाने 10 षटकात 8 बाद 92 धावा केल्या. त्यानंतर शिरसी संघाने 8.5 षटकात 4 बाद 93 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला.
सामन्यानंतर डॉ. गिरीष सोनवालकर, डॉ. आतिक गुट्टी, मंजुनाथ यांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र, रोख रक्कम देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज विनित गुलबर्गा, उत्कृष्ट गोलंदाज विनय शिरसी, मालिकावीर विजय शिरसी यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून आरिफ बाळेकुंद्री, साजिद (पिंटो) तर स्कोअरर म्हणून उमेश यल्लीगार, शिवानंद पाटील, फुरखान यांनी काम पाहिले. नाशिर पठाण यांनी समालोचन केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मनोज कोळी, सचिन इनामदार, सदाशिव सावंत, मतीन सराफ, फयाज हुदली, रमेश हंजी, विनायक कृष्णोजी, फयाज सिद्दकी, सर्फराज देसाई, जुबेर सय्यद, विकी द्राक्षे यांनी विशेष परिश्रम घेतले.