सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांची घोषणा राष्ट्रीय सहकार सप्ताहाचे उद्घाटन
प्रतिनिधी /शिरोडा
सहकार क्षेत्रामध्ये लाखो रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यासाठी या क्षेत्रातील लोकांनी जबाबदारीचे भान ठेवून तळमळीने काम केले पाहिजे. आगामी वर्षभरात राज्यात साधारण दोनशे नवीन सहकारी संस्था निर्माण करण्याचे आमचे लक्ष्य असेल. शिरोडा हे सहकार ग्राम म्हणून उभारण्यात येणार असून राज्यातील हे पहिले सहकारग्राम ठरेल, अशी घोषणा सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केली.
शिरोडा येथे आयोजित केलेल्या 69 व्या राष्ट्रीय सहकार सप्ताहाच्या उद्घाटन सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी गोवा बागायतदारचे अध्यक्ष तथा अनिवासी भारतीय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर, शिरोडा पंचायतीच्या सरपंच मुग्धा मेघनाथ शिरोडकर, जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, सहकार सचिव एम. आर. एम. राव, सहकार निबंधक विशांत गावणेकर, प्रमुख वक्ते संजय किर्लपालकर, गोवा राज्य सहकारी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत नाईक, उपाध्यक्ष बाळकृष्ण प्रभूदेसाई, गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई, गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई, गोवा मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष सखा मळीक, विठ्ठल गावकर, पांडुरंग कुट्टीकर, शिवानंद नाईक, म्हाड्डू प्रभूगावकर हे सहकार क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राज्यातील विविध भागात उत्पादित होणाऱया बागायती मालाची निर्यात करण्यावर भर देणार असल्याचे मंत्री शिरोडकर म्हणाले. तसेच राज्यातील सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी सहकार संस्थांनी आपला व्याजदर चौदा टक्क्यांपेक्षा जास्त ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. ऍड. नरेंद्र सावईकर म्हणाले, भारतीय संस्कृतीमध्ये सहकाराची संकल्पना असल्यानेच येथे सहकार क्षेत्र बऱयापैकी रुजले आहे. सहकार क्षेत्रामुळेच कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात येथील ग्रामीण अर्थव्यवस्था टिकून राहिली. सामान्यातील सामान्य नागरिक या क्षेत्राशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे सहकारात विश्वास महत्त्वाचा आहे. केंद्रातील भाजपा सरकारनेही सहकाराचे महत्त्व ओळखून केंद्रात स्वतंत्र सहकार खाते निर्माण केले आहे, असे त्यांनी सांगितले. सहकार क्षेत्रात उत्कर्षाला भरपूर वाव असून गोमंतकीय युवकांनी या क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन श्री. राव यांनी केले.
संजय किर्लपालकर यांनी ‘सहकार क्षेत्रातील जम आणि निर्यात प्रोत्साहनासाठी सुलभता’ या विषयावर मार्गदर्शन केले. विशांत गावणेकर यांनी प्रास्ताविक तर श्रीकांत नाईक यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गौरी शिरोडकर यांनी केले. सहकार क्षेत्रात योगदान दिलेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.