राजापूर
शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीत ढोलवादन करणाऱया नाटेतील सचिन हरी ठाकूर या तरूणाचे मिरवणुकीदरम्यान आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
प्रतिवर्षाप्रमाणे तिथीनुरूप येणारा शिवजयंती उत्सव सोमवारी नाटे येथे उत्साहात साजरा केला जात होता. सायंकाळच्या सत्रात भव्य मिरवणुकीचे सवाद्य आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत नाटेतील ज्येष्ठ ग्रामस्थ हरी उर्फ बबन ठाकूर यांचा कनिष्ठ चिरंजीव सचिन ठाकूर हा देखील सहभागी झाला होता. सचिन हा ढोल-ताशा पथकप्रेमी होता. कोणत्याही मिरवणुकीत ढोल घेऊन तो अग्रभागी असे. सोमवारीही त्याने शिवजयंती सोहळय़ाच्या उत्साहात आधी ताशा वाजवला. त्यानंतर बराच वेळ ढोलवादन केले. या दोन्ही वाद्यांच्या वादनानंतर त्याने झांज वाजवण्यास घेतली. या दरम्यानच त्याची प्रकृती बिघडली व त्याला उलटय़ा झाल्या. रक्तदाब मोठय़ा प्रमाणात वाढल्याने त्याला धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले तेथून अधिक उपचारार्थ रत्नागिरी येथे नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. सचिनच्या आकस्मिक निधनाने अवघा नाटे गाव व परिसर हळहळला. त्याच्यावर मंगळवारी नाटेत अंत्यसंस्कार करण्यात आले.