प्रतिनिधी/ सातारा
शिवथर (ता. सातारा) गावच्या हद्दीत धोम डाव्या कालव्यालगत रस्त्याच्या कडेला मद्यपान करत बसलेल्या दोघांना दुचाकीवरुन आलेल्या सहाजणांनी कोयत्याच्या मुठीने मारहाण करत व गळय़ाला कोयता लावून जीवे मारण्याचा धाक दाखवत 1 लाख 73 हजार रुपये व मोबाईल, किंमती घडय़ाळ असा एकूण दोन लाखाचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेल्याची खळबळजनक घडली आहे.
याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात अजित शिवाजी निकम (वय 43, मूळ रा. तडवळे संमत कोरेगाव, सध्या रा. रामडोह आळी, वाई) यांनी तक्रार दिली आहे. दि. 18 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घडली असून तक्रारदार अजित निकम व त्यांचा मित्र अमित अशोक साबळे हे शिवथर गावच्या हद्दीतील धोम कालव्यानजिक रस्त्याच्या कडेला मद्यपान करत बसले होते.
त्यावेळी तिथे अचानकपणे दोन मोटारसायकलवरुन सहाजण 20 ते 25 वयोगटातील युवक तिथे आले. त्यांनी मद्यपान करत असलेल्या अजित निकम यांना कोयत्याची मूठ डोक्यात मारुन मारहाण तर अमित साबळे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी चोरटय़ांनी कोयता अमित साबळे यांच्या गळय़ाला लावून त्यांना जिवे मारण्याचा धाक दाखवून अजित निकम यांच्याकडे असलेली रोख रक्कम 1 लाख 73 हजार, दोन मोबाईल, घडय़ाळ असा एकूण दोन लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेला.
या घटनेमुळे निकम व साबळे भयभीत झाले होते. अजित निकम यांनी दि. 20 रोजी याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात जावून अज्ञात सहा चोरटय़ांविरुध्द तक्रार दाखल केली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी भेट दिली असून तपासाबाबत सूचना केल्या आहेत. सहाजणांवर दरोडय़ाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी या गुन्हय़ाचा पुढील तपास करत आहेत.