ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने पुण्यात त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात अनेक दिग्गजांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखिल शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संदेश दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरूवातीला बाबासाहेब यांना मराठी भाषेतून शुभेच्छा दिल्या. मराठीतून शुभेच्छा देताना मोदी म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांना माझा साष्टांग नमस्कार!
पुढे ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या इतिहासाचे शिखर पुरुष आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवरायांचा इतिहास देशभरात पोहचविला. शिवचरीत्र सांगण्याची बाबासाहेबांची शैली अतुलनिय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आदर्श उभे केले आहेत, जी शिकवण दिली आहे, तिचे आचरण करण्याची शक्ती परमेश्वराने मला द्यावी अशी प्रार्थना मी देवाकडे करतो, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य आजही आपल्या देशाला प्रेरणा देत असल्याचे सांगतानाच छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय आपल्या देशाचा विचारही करता येणार नाही असेही मोदी यांनी सांगितले.
यावेळी बाबासाहेबांच्या कार्याचे कौतुक करताना मोदी म्हणाले, तरुण इतिहासकारांना बाबासाहेबांकडून बऱयाच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. इतिहासाबरोबरच बाबासाहेबांनी वर्तमानाचीही काळजी घेतली, गोवा मुक्ती संग्रामापासून ते दादरा नगर हवेलीच्या संघर्षाच्या वेळेस त्यांची भूमिका कौतुकास्पद ठरल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आणि इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी जे योगदान दिले आहे त्यासाठी आपण सर्वच त्यांचे ऋणी राहू. या शंभराव्या वाढदिवसानिमित्त देशाला त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच आहे. मी भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं अशी प्रार्थना मी करतो, अशा शब्दांसहीत मोदींनी बाबासाहेबांना शुभेच्छा दिल्या.