नाशिक विमानसेवेच्या उद्घाटनाला राहणार उपस्थित : पहिल्या विमानाने करणार प्रवास
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील अनेक दिवसांपासून मागणी होत असलेल्या बेळगाव-नाशिक विमानसेवेला येत्या 25 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. या विमानफेरीसाठी नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून 25 रोजी बेळगाव येथे होणाऱया उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.
उडान अंतर्गत हा मार्ग मंजूर झाल्यापासून गोडसे यांनी बेळगाव शहराला विमानसेवेसाठी प्रयत्न सुरू केले होते. बेळगावपासून कोल्हापूर, गोवा जवळ असल्याने नाशिकमधून या फेरीला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास खासदार गोडसे यांना आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहून पहिल्या विमानाने नाशिकला रवाना होणार आहेत.
शिवसेना कार्यालयाला देणार भेट
खासदार गोडसे विमानसेवेच्या उद्घाटनासाठी बेळगावमध्ये येणार आहेत. यावेळी ते रामलिंगखिंड गल्ली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला भेट देणार आहेत, अशी माहिती शिवसेना सीमाभागाचे सहसंपर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांनी नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱयांच्या बैठकीत दिली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.