वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अलीकडेच ‘राफेल’ या अत्याधुनिक फायटर विमानांचा भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समावेश झाला. ‘गोल्डन अŸरो’ म्हणून ओळखल्या जाणाऱया राफेलच्या पहिल्या स्क्वॉर्डनमध्ये एका महिला फायटर पायलटचा समावेश करण्यात आला आहे. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह असे या महिला फायटर पायलटचे नाव आहे.
शिवांगी सिंह 2017 साली भारतीय हवाई दलाच्या सेवेत रुजू झाल्या होत्या. त्या दुसऱया बॅचमधील फायटर पायलट आहेत. त्या लवकरच अंबालास्थित राफेलच्या 17 व्या स्क्वॉर्डनच्या भाग होतील. नव्यानेच समावेश झालेल्या राफेल विमानांच्या वैमानिकांच्या चमूमध्ये हवाई दलातील महिला वैमानिकांची निवड करण्यात येणार असल्याचे संकेत सोमवारीच हवाई दलाकडून देण्यात आले होते. भारतीय हवाई दलातील दहा महिला वैमानिकांनी सुखोई, मिग 29 यासह सर्व प्रकारची लढाऊ जेट विमाने चालवली आहेत.
प्रशिक्षण सुरू 2017 मध्ये हवाई दलात रुजू झाल्यापासून फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या मिग-21 बायसन विमानाच्या वैमानिक आहेत. राजस्थानातून त्या अंबालामध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांनी राजस्थानमध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासोबत मिग-21 बायसन विमान उडवले आहे. मूळ वाराणसी येथील असलेल्या शिवांगी सिंह यांचे सध्या प्रशिक्षण सुरू आहे.