सदाशिवगड येथे शिवजयंती सोहळा उत्साहात : मिरवणुकीत भगवेमय वातावरण
प्रतिनिधी / कारवार
कारवार तालुक्यातील इतिहास प्रसिद्ध सदाशिवगड येथे शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी युथ असोसिएशन आणि शिवप्रेमींतर्फे करण्यात आले होते. सदाशिवगड येथील शिवजयंती सोहळ्याची सुरुवात शिवाजी संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयापासून होणार असल्याची माहिती सर्वांनाच असल्यामुळे सदाशिवगडसह परिसरातील शिवप्रेमी शुक्रवारी सकाळपासूनच महाविद्यालयाच्या आवारात जमा होऊ लागले. त्यानंतर महाविद्यालयाच्या आवारातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी पुतळ्याचा चबुतरा फुलांनी आकर्षकरित्या सजविण्यात आला होता. पूजनाच्या वेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी आदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
उपस्थित शिवप्रेमींना उद्देशून बोलताना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते अरुणकुमार साळुंके म्हणाले, आजच्या युवा पिढीने शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक भारतीयाने शिवाजी महाराजांचे गुण आणि आदर्श आत्मसात केल्यास भारत देश जगातील एक बलाढय़ आणि पराक्रमी नागरिकांचा देश म्हणून नावारुपास येण्यास अधिक वेळ लागणार नाही.
शिवाजी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य उदय पवार म्हणाले, प्रामाणिक आणि निष्ठावंत सैनिकांसह बलाढय़ राजवटीवर मात कधी व कसे करायचे हे शिवाजी महाराजांनी जागतिक योद्धय़ांना दाखवून दिले. शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य अफलातून होते. शिवाजी महाराजांचे केवळ गोडवे न गाता त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर आम्ही भारतीयांनी चालण्याचा प्रयत्न केल्यास पुन्हा एकदा देशात शिवशाही नांदण्यास अधिक वेळ लागणार नाही, असे पुढे पवार यांनी सांगितले.
शिवाजी इंग्रजी माध्यम शाळेची विद्यार्थिनी निवेदिता तळेकर हिने आपल्या भाषणात शिवाजी महाराजांनी केलेल्या महान कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.
शिवजयंती सोहळ्यात कारवार-अंकोलाच्या आमदार रुपाली नाईक, सदाशिवगड ग्रा. पं. अध्यक्षा स्वाती देसाई, देवीदास देसाई, संदीप राणे, उदय राणे, धीरज राणे, अनिकेत माजाळीकर, रोषण नाईक, विनायक गावकर, निखील देसाई, रुपेश कोठारकर, दिलीप गझीनकर, किशन राणे, सिद्धार्थ गोसावी, सोहन नाईक, अभी नाईक, दिलखूश म्हाळसेकर, साई, शुभम राणे, मिथुन देसाई, शरद कलघुटकर आदी सहभागी होते.
आकर्षक आणि भव्य मिरवणूक…!
पूजन कार्यक्रमानंतर आकर्षक आणि भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. शेकडो नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते. महाविद्यालयापासून मिरवणुकीच्या मार्गावर भगव्या पताका बांधण्यात आल्या होत्या. मिरवणुकीत सहभागी झालेल्या अनेकांनी भगवा पेहराव परिधान केला होता. भगव्या फेटय़ामुळे आणि हातात घेतलेल्या शिवरायांचे चित्र असलेल्या भगव्या ध्वजांमुळे सदाशिवगडच्या मुख्य रस्त्यावरील वातावरण भगवेमय बनून राहिले होते. झांजपथकातील ढोल ताशामुळे मिरवणुकीची शोभा अधिकच वाढली होती. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिलेले नागरिक मिरवणुकीचा मनसोक्त आनंद लुटत असल्याचे दिसून येत होते. मिरवणुकीतील चित्ररथ तर सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडत होता. चित्ररथावरील वेशभूषेतील शिवाजी महाराज, जिजाबाई आणि मावळ्यांनी शिवसृष्टी निर्माण केली होती. मिरवणूक दुर्गादेवी देवस्थान, सदाशिवगड किल्ल्यावर नेऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली.