प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गुरूवारी राजमाता जिजाऊ सभागृहात होणार आहे.अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांची उपस्थिती असणार आहे. यंदा 60 हजार 167 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. 43 स्नातकांना पीएच. डी. पदवी प्रमाणपत्र तर 18 पारितोषिके व्यासपीठावर प्रदान करण्यात येणार आहे.
सकाळी सात वाजता कमला कॉलेजमध्ये कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होणार आहे. जनता बजार, राजारामपुरी, आईचा पुतळा, सायबर चौकमार्गे शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊ सभागृहात ग्रंथदिंडीची सांगता होणार आहे. दरम्यान रॅलीत सहभागी विद्यार्थी लेझिम, झांजपथक आणि पथनाटय़ाचे सादरीकरण केले जाणार आहे. ग्रंथदिंडीची सांगता झाल्यानंतर सकाळी 10.45 वाजता पदवी प्रमाणपत्र प्रदान सोहळय़ाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. 20 स्टॉलवर पदवी प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी पदवीदान समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपले पदवी प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी केले आहे.
राष्ट्रपती सुवर्णपदक आणि कुलपतीपदकाचे मानकरी
विद्यापीठाच्या सर्वसाधारण कौशल्यासाठीच्या राष्ट्रपती सुवर्णपदकाचा मानकरी विद्यापीठातील इंग्रजी अधिविभागाचा विद्यार्थी अभिषेक श्रीराम ठरला आहे. एम. ए. अभ्यासक्रमातील संस्कृत या विषयामध्ये सर्वाधिक गुणांसह किर्ती ननवरे हिने कुलपतीपदक पटकावले आहे.
दूरशिक्षण विभागात महाविद्यालयांना पदवी प्रमाणपत्र देण्याची सोय
शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील 293 महाविद्यालयांसाठी पदवी प्रमाणपत्र वितरण व्यवस्था दूरशिक्षण विभागात केली आहे. सकाळी 7 ते 10 या वेळेत आणि पदवी प्रमाणपत्र वितरणाचा प्रमुख कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी 12 ते 3 या वेळेत महाविद्यालयांना पदवी प्रमाणपत्र दिली जाणार आहेत.
यंदा पहिल्यांदाच गाऊन बंद
विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा म्हटलं की, पदवी घेणारी सर्व स्नातक भगव्या कलरचा गाऊन आणि डोप्यावर टोपी घालून फिरताना दिसायचे; पण विद्यापीठातील 293 महाविद्यालयांना गाऊन पुरवणे शक्य नसल्याने यंदा गाऊन ऐवजी उपरणे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा पदवीदानचा गाऊन घालून फोटो काढण्याचा आनंद विद्यार्थ्यांना घेता येणार नाही.