पंजाब पॉलिटिक्स टीव्हीचा ऍप, वेबसाइट, सोशल मीडिया हँडलवर बंदी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने खलिस्तानचे समर्थन करणारी प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘शीख फॉर जस्टिस’वर कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पंजाब पॉलिटिक्स टीव्हीचा ऍप, वेबसाइट आणि सोशल मीडिया हँडलवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. मंत्रालयाला मिळालेल्या इनपूटच्या आधारावर पंजाब पॉलिटिक्स टीव्हीच्या सर्व प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे. पंजाब पॉलिटिक्स टीव्हीचे कनेक्शन ‘शीख फॉर जस्टिस’शी असल्याचे बोलले जात आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला मिळालेल्या माहितीनुसार पंजाब पॉलिटिक्स टीव्हीच्या या चॅनेल्सद्वारे विधानसभा निवडणुकीदरम्यान वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न झाला होता. ऑनलाईन प्रसारमाध्यमांचाही याकरता वापर केला जात होता. मंत्रालयाने आयटी नियमांच्या अंतर्गत आपत्कालीन शक्तींचा वापर करत पंजाब पॉलिटिक्स टीव्हीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली आहे.
गुरपतवंत सिंह ‘वैयक्तिक दहशतवादी’ घोषित
शेतकरी आंदोलनादरम्यान ‘शीख फॉर जस्टिस’ अत्यंत चर्चेत राहिली होती. या संघटनेची निर्मिती 2007 साली अमेरिकेत झाली होती. एसएफजेचा मुख्य अजेंडा पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान निर्मितीचा आहे. अमेरिकेत वकील अणि पंजाब विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतलेला गुरपतवंत सिंह पन्नू या संघटनेचा मुख्य चेहरा आहे. शीख फॉर जस्टिस संघटनेला अवैध कारवाया (प्रतिबंधक) अधिनियम, 1697 अंतर्गत बेकायदेशीर घोषित करण्यात आले आहे. एसएफजेचा संस्थापक गुरपतवंत सिंह पन्नूला फुटिरवादाला बळ देण्यासाठी युएपीए अंतर्गत ‘वैयक्तिक दहशतवादी’ घोषित करण्यात आले आहे. सरकार भारतात समग्र माहिती वातावरणाला सुरक्षित करण्यासाठी सतर्क आणि प्रतिबद्ध असल्याचे माहिती-प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे.