सेन्सेक्स 571 अंकांनी घसरणीत : डोडला डेअरीचे समभाग तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
युपेन-रशिया यांच्या चर्चेतून मार्ग निघत नसण्यासह जागतिक बाजारातला नकाराचा सूर व कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ या साऱयाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर नकारात्मक दिसला. सेन्सेक्स, निफ्टी दोन्हीही घसरणीसोबत बंद झाले असून निफ्टीत धातू आणि मीडिया निर्देशांक तेजीसह बंद झाले आहेत.
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 571 अंकांसह घसरत 57,292.49 अंकांवर तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 169 अंकांच्या घसरणीसह 17,117.60 अंकांवर बंद झाला. रशिया-युपेन युद्धाच्यासंदर्भात बोलणी फिस्कटल्याचा परिणाम बाजारात नकारात्मक दिसला. सकाळी सेन्सेक्स 160 अंकांच्या तेजीसह खुला झाला होता. पॉवरग्रिड कॉर्प, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंटस्, एचयुएल, एचसीएल टेक, कोटक बँक, एसबीआय, इंडसइंड बँक, नेस्ले, भारती एअरटेल, ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स, एल अँड टी आणि महिंद्रा आणि महिंद्रा यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले. कोल इंडिया, हिंडाल्को, युपीएल, टाटा स्टील आणि एनटीपीसी यांचे समभाग 3.3 टक्केपर्यंत वाढलेले दिसले. यांना एचडीएफसी बँक, सन फार्मा, सिप्ला आणि टायटन यांनी तेजी राखत साथ दिली. दुसरीकडे डोडला डेअरीचे समभाग सर्वाधिक 19 टक्के वाढलेले दिसले. याचप्रमाणे ग्रीव्हज कॉटनचे समभागही 6 टक्के वाढत बाजारात 187 रुपयांवर व्यवहार करत होते. मागच्या दोन सत्रात हा समभाग 15 टक्के इतका उसळी घेऊ शकला आहे. निफ्टी बँकेचा निर्देशांकही सोमवारी नकारात्मक कल दाखवत बंद झाला. 410 अंकांच्या घसरणीसह निफ्टी बँक निर्देशांक 36018.50 अंकांवर बंद झाला होता. विक्रीच्या दबावाखातर बाजार नकारात्मक स्थितीत होता, बीएसईवरील 1561 समभाग तेजीसह बंद झाले होते. निफ्टीत धातू आणि मीडिया निर्देशांक तेजीसह बंद झाले.
इतरत्र पाहता युरोपियन बाजारात काहीशी तेजी होती. अमेरिकेतील बाजार तेजीत होते. आशियाई बाजारात निक्केई 174 अंकांनी व शांघाई कम्पोझीट 2 अंकांनी तेजी राखत होता. हँगसेंग, कोस्पी बाजार मात्र घसरणीत होते.