सेन्सेक्समध्ये 85 अंकांची वाढ, औषध कंपन्या, बँकांचे समभाग तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजार आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी तेजीसह बंद होण्यामध्ये यशस्वी झाला आहे. फार्मा आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांनी तेजी राखत बाजाराला आधार दिला.
शुक्रवारी सरते शेवटी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 85 अंकांनी वधारत 55,550.30 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 35 अंकांच्या वाढीसह 16630.45 अंकांवर बंद झाला होता. शुक्रवारी सकाळी 246 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 55,218 अंकांवर खुला झाला होता. सेन्सेक्सने दिवसभरामध्ये 55833 ही उच्चांकी पातळी आणि 55049 ही निच्चांकी पातळी गाठली होती. 30 समभागांपैकी 16 तेजीसह तर 14 समभाग घसरणीसह बंद झाले. सनफार्मा, डॉ. रेड्डीज लॅब्स, पॉवरग्रिड कॉर्प, टायटन, एशियन पेंट्स आणि आयटीसी यांचे समभाग तेजी राखून होते. यासोबत बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, कोटक बँक, एचडीएफसी बँक यांचे समभाग देखील तेजीत होते. दुसरीकडे मारुती सुझुकी, एनटीपीसी, नेस्ले, ऍक्सिस बँक, टाटा स्टील, महिंद्रा आणि महिंद्रा, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि इंडसइंड बँक तसेच इन्फोसिस यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.
शेअर बाजारात 447 समभागांना अप्पर सर्किट आणि 134 समभागांना लोवर सर्किट लागला होता. याचाच अर्थ एका दिवसात यांच्या किंमतीमध्ये कोणत्याही प्रकारचा चढ-उतार होणार नाही. लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 252.83 लाख कोटी रुपये राहिले होते. निफ्टी निर्देशांकाने दिवसभराच्या व्यवहारात 16694 चा उच्चांकी स्तर आणि 16470 चा निच्चांकी स्तर गाठला होता. निफ्टीतील 50 पैकी 28 समभाग तेजीत आणि 22 समभाग मात्र घसरणीत होते. यामध्ये टाटा कन्झ्युमर, नेस्ले यांचे समभाग घसरणीत तर सिप्ला, भारत पेट्रोलियम, कोल इंडिया, जेएसडब्ल्यू आणि इंडियन ऑईल यांचे समभाग तेजीमध्ये होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेतील बाजार घसरणीत आणि युरोपियन बाजार तेजी दर्शवत होता. आशियाई बाजारात निक्केई 527 अंकांनी घसरलेला होता. यासोबत कोस्पी आणि हँगसेंग निर्देशांकही घसरणीत होते. शांघाय कंपोझिट मात्र 13 अंकांच्या तेजीसह व्यवहार करत होता.