ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्रामध्ये २ हजार सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सेवाकार्य करणारे महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्, लंडनचा जागतिक पातळीवर पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोविड काळात २० जिल्हयांमध्ये तळागाळात जाऊन केलेल्या आरोग्यविषयक व सामाजिक कार्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक (निवृत्त) डॉ.विठ्ठल जाधव, माजी खासदार बसवराज पाटीलवर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् महाराष्ट्रचे उपाध्यक्ष मेहबुब सय्यद, चित्रपट दिग्दर्शक सिकंदर सय्यद, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् प्राप्त आदम सय्यद यांच्या उपस्थितीत पुरस्कार व प्रमाणपत्र शेखर मुंदडा यांना देण्यात आले. शेखर मुंदडा हे महा एनजीओ फेडरेशनसह आर्ट ऑफ लिव्हिंगसह अनेक संस्थांच्या माध्यमातून राज्यभर सामाजिक कार्य करीत आहेत.
डॉ.विठ्ठल जाधव म्हणाले, मदत लाभार्थींपर्यंत पोहोचविण्याचे काम सामाजिक संस्था करीत असतात. अशाच सेवाभावी संस्थांचे जाळे महाराष्ट्रभर पसरले असून त्याची मूठ बांधण्याचे काम शेखर मुंदडा यांनी केले. रक्ताचे वेगवेगळे गट असले, तरी समाजसेवा करणा-यांचा एकच गट असतो. संवेदनशीलता बाळगून दुस-याला मदतीचा हात देणारा हा गट आहे. महा एनजीओ फेडरेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून मुंदडा यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
सिकंदर सय्यद म्हणाले, कोविड काळात महा एनजीओ फेडरेशन गरजवंतांच्या मदतीसाठी धावून आली आहे. देशसेवा हीच खरी राष्ट्रसेवा असून आपल्या स्वत:च्या घराप्रमाणे देशाचाही विचार प्रत्येकाने करायला हवा. शेखर मुंदडा यांनी २० जिल्हयांमध्ये रक्तदान शिबीरे भरवून रक्ताची गरज पूर्ण करण्यास सहाय्य केले आहे. त्यामुळे तळागाळात जाऊन कार्य करणा-या मुंदडा यांना आम्ही या पुरस्काराने सन्मानित करीत आहोत.
शेखर मुंदडा म्हणाले, महा एनजीओ फेडरेशनच्या स्थापनेला ४ वर्षे पूर्ण होत आहेत. प.पू. श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनामुळे हे कार्य आजपर्यंत सुरु आहे. वसुधैव कुटुंबकम् हा संकल्पनेवर आधारित आम्ही कार्य करीत असून जाती-पातीच्या पुढे काम करण्याचा प्रयत्न केला. कोविड काळात ३.५ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना मदत दिली असून महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेली महा एनजीओ फेडरेशन आता देशपातळीवर देखील उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.