अध्यक्षपदी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, सदस्यपदी प्रदीप मालगावे
प्रतिनिधी / कोल्हापूर
शेतकरी सहकारी संघाच्या मंगळवारी प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे तर सदस्यपदी सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांची नियुक्ती केली आहे. संचालक मंडळ रिक्त झाल्याने या नियुक्त्या करण्यात आला. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी हे आदेश काढेल आहेत.
विरोधी आघाडीतील सदस्यांच्या राजीनाम्याने अल्पमतात आलेल्या सत्ताधारी गटाचे चेअरमन जी. डी. पाटील यांच्यासह उर्वरित संचालकांनीही सोमवारी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्याकडे राजीनामे दिले होते.
सप्टेंबर 2015 मध्ये 19 जागांसाठी निवडणूक झाली होती. 19 संचालकांपैकी युवराज पाटील, एम. एम. पाटील, मानसिंग पाटील हे भूविकास बँक प्रकरणात अपात्र ठरले. दरम्यानच्या काळात 5 संचालक मयत झाले. त्यापैकी 4 संचालकांचे एकाच महिन्यामध्ये आकस्मित निधन झाले. उर्वरित 11 पैकी शिवाजीराव कदम, मानसिंगराव जाधव, विजयादेवी राणे यांनी राजीनामे दिल्याने संचालक मंडळ अल्पमतात आले होते. सहकार कायद्यानुसार अल्पमतातील संचालक मंडळास कारभार करता येत नाही. त्यामुळे चेअरमन जी. डी. पाटील यांच्यासह सर्वच सत्ताधारी संचालकांनी राजीनामे दिले. त्यानंतर प्रशासक मंडळ अस्तित्वात आले आहे.