प्रतिनिधी/ बेळगाव
2019 मधील खरीप हंगामातील पीक सर्वेक्षण योजनेंतर्गत संग्रहित केलेल्या पिकांच्या माहितीबाबत आक्षेप असल्यास ते नोंदविण्यासाठी 30 जानेवारी अखेरची तारीख देण्यात आली आहे. आक्षेप नोंदवू इच्छिणाऱया शेतकऱयांना ‘पीक (बेळे) दर्शक मोबाईल ऍप’चा वापर करावा लागणार आहे.
जिल्हय़ात याआधीच खरीप हंगामात मोबाईल ऍपद्वारे पिकांचा सर्व्हे करण्यात आला आहे. खरीप हंगामातील पिकांचा सर्व्हे कृषी, फलोत्पादन, रेशीम, महसूल आणि सांख्यिकी खात्यांच्या सहयोगाने हे काम पूर्ण करण्यात आला आहे. संग्रहित केलेल्या या पिकांच्या माहितीबाबत आक्षेप असल्यास शेतकरी बांधवांना पीक दर्शक मोबाईल ऍपचा वापर करून आक्षेप नोंदविता येणार आहे.
शेतकऱयांना पीक दर्शक ऍपसाठी गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन पीक (बेळे) दर्शक असे नमूद करून डाऊनलोड करावे लागणार आहे. सदर ऍपद्वारे आपल्या जमिनीत पिकविलेल्या पिकांची माहिती संग्रहित होणार आहे. छायाचित्रासह ती पाहता येणार आहे. आपल्या पिकांच्या संबंधित कोणत्याही प्रकारचा आक्षेप असल्यास पीक दर्शक ऍपमध्ये आक्षेप नेंदविण्याद्वारे अथवा ध्वनिमुद्रण करून पाठविता येणार आहे.
पीक सर्व्हे तंत्रांश (क्रॉप सर्व्हे वेब ऍप्लिकेशन) द्वारेही आक्षेप नोंदविता येणार आहे. अथवा शेतकरी बांधवांना रयत संपर्क केंद्रात जाऊन लिखित स्वरुपात आक्षेप नोंदविता येणार आहे. जिल्हय़ातील शेतकरी बांधवांनी या उपक्रमाचा वापर करून आपल्या पिकांबाबत आक्षेप असल्यास नोंदवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी केले आहे.