वार्ताहर/ अकोळ
शैक्षणिक क्षेत्रात महिला वर्गाची होणारी अधोगती नाहीशी करण्यासाठी महिला वर्गाने जागृत राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मराठा मंडळ शैक्षणिक संस्थेच्या नूतन संचालिका मीनाताई जितेंद्र सुर्वे-भारमल यांनी केले. येथील मराठा मंडळ गर्ल्स हायस्कूल, जिजामाता महिला मंडळ, भैरवनाथ को-ऑप. सोसायटी, मराठा भवन आदींच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षपदी अशोकराव भारमल होते.
मीनाताई सुर्वे-भारमल म्हणाल्या, येथील स्थानिक संस्था नावारुपास आणण्यासाठी दिवंगत शंकरराव भारमल यांनी सहकाऱयांसह केलेल्या दैदिप्यमान कार्याची दखल घेऊनच मला संचालक म्हणून कार्य करण्याची संधी दिली आहे. स्थानिक पातळीवरील कार्यरत सदस्यांचे सहकर्य व मार्गदर्शनाखाली येथील संस्था नावारुपास आणण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देऊन त्यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी स्थानिक शिक्षण संस्था संचालक, प्रशाला, जिजामाता महिला मंडळ, भैरवनाथ को-ऑप. सोसायटी, मराठा समाज सांस्कृतिक भवन यांच्यावतीने मीनाताई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जयश्री पुंडे, रघुनाथ सोळांकूरे, मुख्याध्यापक व्ही. के. गावडे, भैरवनाथ को-ऑप. चे अध्यक्ष विवेकानंद सोळांकूरे यांच्यासह सर्व संस्थांचे संचालक, पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, एसडीएमसी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. जे. एन. चव्हाण यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.