ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी रात्रीपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान आज सकाळी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांना यश आले.
शोपियांमधील सुगन गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दल आणि जम्मू पोलिसांनी मंगळवारी रात्रीपासून शोधमोहीम हाती घेतली. एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना सरेंडर करण्यास सांगण्यात आले. मात्र, दहशतवाद्यांनी जवान आणि पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. भारतीय जवान आणि पोलिसांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास जवान आणि पोलिसांना यश आले.
चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून बंदुका आणि दारुगोळा जप्त करण्यात आला असून, सुगन परिसरात शोधमोहीम सुरू आहे.