ऑनलाईन टीम / कोलंबो :
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या (आयओसी) श्रीलंकेतील उपकंपनीने पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. महिन्याभरात तिसऱ्यांदा ही वाढ करण्यात आली आहे. लंका इंडियन ऑईल कंपनीने (एलआयओसी) सांगितले की, डिझेलच्या दरात प्रतिलिटर 75 रुपये आणि पेट्रोलच्या दरात 50 रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. आता श्रीलंकेत पेट्रोल 254 रुपये तर डिझेल 214 रुपये प्रति लीटर झालं आहे.
एलआयओसी’चे व्यवस्थापकीय संचालक मनोज गुप्ता म्हणाले, श्रीलंकन रुपयाच्या किंमतीत मोठी घसरण झाल्यामुळे इंधन दरवाढीचा हा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. वाढीव किंमती आजपासून लागू झाल्या आहेत. सात दिवसांतच अमेरिकी डॉलरच्या तुलनेत श्रीलंकेचा रुपया 57 रुपयांनी घसरला आहे. याचा थेट परिणाम तेल आणि पेट्रोल उत्पादनांच्या किंमतींवर झाला आहे.
युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर पाश्चिमात्य देश रशियावर निर्बंध लादत आहेत. त्यामुळे तेल आणि गॅसच्या किंमतीही वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे आम्हाला आता खूप तोटा सहन करावा लागत आहे, त्यामुळे किमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही. भाववाढ होऊनही मोठे नुकसान सोसावे लागत आहे, असेही गुप्ता यांनी म्हटले आहे.