बेंगळूर/प्रतिनिधी
सँडलवूड ड्रग्ज प्रकरणातील आरोपी वीरेन खन्नाने सात वेगवेगळ्या ईमेल आयडीचा वापर केल्याचा आरोप असून त्याच्या साथीदारांनी पोलीस कोठडीत असताना पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना हॅक करण्याचा प्रयत्न केला होता.
केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पोलिसांनी ४ सप्टेंबर रोजी त्याला अटक केली होती. वीरेनने जामीन अर्जावर याचिका दाखल केली होती. एनडीपीएस प्रकरणांसाठी विशेष कोर्टासमोर हा खटला आहे.
फिर्यादीने दाखल केलेल्या हरकतींमध्ये असे सांगितले होते की ड्रग्ज प्रकरणी अटक केलेल्या आरोपींशी खन्नाचा थेट संपर्क होता. खन्नाकडे सात ईमेल आयडी असल्याची माहिती फिर्यादींनी कोर्टाला दिली. त्याने तीन ईमेल खाती उघडली आहेत आणि उर्वरित चार खाती उघडण्यास नकार दिला आहे.
१२ सप्टेंबर रोजी याचिकाकर्त्याच्या साथीदारांनी ईमेल खात्यात असलेली माहिती नष्ट करण्याच्या उद्देशाने ईमेल खाते हॅक करण्याचा प्रयत्न केला, असा खटला न्यायालयात दाखल करण्यात आला. फिर्यादींनी कोर्टाला सांगितले की, खन्नाच्या चौकशी दरम्यान ड्रग्स खरेदी, वित्तपुरवठा आणि अन्य आरोपींना सूचना देताना त्याचा सहभाग असल्याचे उघड केले.
फिर्यादींनी त्याला जामीन देण्यास आक्षेप घेतला. दरम्यान त्याचे ईमेल अकाउंट्स, सोशल मीडिया अकाउंट्स आणि मोबाईल फोनचा डेटा अद्याप मिळू शकलेला नाही. फिर्यादी व बचाव पक्षाचे वकील यांचे युक्तिवाद ऐकणारे विशेष न्यायाधीश जी. एम. शीनप्पा यांनी १० नोव्हेंबर रोजी खन्ना यांनी दाखल केलेली जामीन याचिका फेटाळून लावली.