संगमेश्वर / प्रतिनिधी :
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेले एटीएम चोरट्याने फोडून पलायन केले. मात्र एटीएममध्ये असलेल्या वॉचमनने प्रसंगावधान दाखवित त्याचा पाठलाग केला. तसेच पोलिसांना याबाबत महिती दिली.
सलग पाच तासाच्या थरारक पाठलागानंतर चोरटा पोलिसांच्या जाळयात सापडला आहे. पोलिसांनी वॉचमनच्या साहाय्याने फिल्मी स्टाईलने चोराला पकडले असून या चोरट्याकडून अनेक गुन्हांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हेमंत देसाई (रा. मुंबई ) असे पकडण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळ श्री समर्थ कृपा बिल्डिंगच्या तळमजल्यावर कॅनरा बँकेचे एटीएम मशिन आहे. शुक्रवारी रात्री ११.१५ वा. संदिप नारायण महाडिक याने त्या चोरट्याला हटकले. तो पळू लागल्यावर त्याचा पाठलाग सुरु केला. तसेच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक उदय झावरे हे पोलिस शिंदे, देशमवांड, खोंदल, आव्हाड, रामपुरे तसेच होमगार्ड झेपले यांना घेवून घटनास्थळी आले. तोपर्यंत चोरटा संगमेश्वर बसस्थानकाच्या जवळच्या घरांमध्ये शिरला त्यानंतर पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरु केला. सलग पाच तास फिल्मी स्टाईलने रात्रीच्या दरम्याने केलेल्या पाठलागानंतर चोरट्याला पकडण्यात यश आले. याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यात मधुकर देवरुखकर यांनी फिर्याद दिली आहे.