बेळगाव : संगीत कलाकार संघातर्फे रविवार दि. 17 रोजी सकाळी 10 वाजता संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तन्वी इनामदार आणि हृषिकेश हेर्लेकर यांचे गायन होणार आहे.सरस्वती वाचनालयाच्या माई ठाकुर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. तन्वी ही संगीत शिक्षिका अर्चना बेळगुंदी यांची नात आणि शिष्या असून लहान वयातच स्वर-लयीचे उत्तम संस्कार तिला प्राप्त झाले आहेत. अनेक स्पर्धा, कार्यक्रम आणि अल्बममध्ये तिने गायन केले आहे.
हृषिकेश हेर्लेकर हे संगीत अलंकार पदवीधारक असून वेदविद्येतील उच्च पदवीधारकही आहेत. नंदन हेर्लेकर यांचे पुतणे आणि शिष्य असणारे हृषिकेश यांनी आजवर माणिकनगर पुणे, मुंबई, धारवाड, काशीसह अनेक ठिकाणी गायन कार्यक्रम केले असून अनेक ध्वनिमुद्रणात सहभाग घेतला आहे. कर्नाटक शासनाच्या धार्मिक विभागाच्या बेळगाव जिल्हय़ाचे ते प्रतिनिधीत्व करत आहेत. गायकांना संवादिनीवर योगेश रामदास आणि तबल्यावर संतोष पुरी हे साथ करणार आहेत. या कार्यक्रमास सरस्वती वाचनालयाचे सहकार्य लाभले असून रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघाने केले आहे.