कोल्हापूर/प्रतिनिधी
भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष आणि तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले संदीप देसाई यांनी पुन्हा घरवापसी केली. गुरुवारी भाजपच्या बिंदू चौक येथील कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार महेश लांडगे, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे पाटील यांच्या उपस्थितीत देसाई यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यावर भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. देसाई यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केल्याने उत्तर च्या पोटनिवडणुकीत भाजपला बळ मिळाले आहे.
भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी दोन वर्षांपूर्वी पदाचा राजीनामा देत भाजपला रामराम केले होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जी शहरात भाजपचा प्रसार उत्तम प्रकारे केला होता. तरुणांची मोठ्या प्रमाणात मोट त्यांनी बांधली होती. मात्र काही कारणास्तव त्यांना जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. गेली दोन वर्षे ते राजकारणापासून अलिप्त होते. 12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या जन्मदिनी देसाई यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला होता. मात्र गेली तीन महिने त्यांना कोणतेही पद दिले नव्हते. तर पुण्याचे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष बापू मानकर हे देसाई यांना पुन्हा भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील होते. गेल्या चार दिवसांपासून ते भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी देसाई यांच्या संपर्कामध्ये होते. मानकर यांच्या मध्यस्तीला अखेर यश मिळाले असून देसाई यांनी गुरुवारी पुन्हा भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. उत्तर पोटनिवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात देसाई यांचा प्रवेश भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे.