सिंधुदुर्गला मान मिळाल्याचे कौतुकच – गृहमंत्र्यांचे गौरवोद्गार : सीसीटीव्ही सनियंत्रण योजनेचे ऑनलाईन लोकार्पण
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ाला हा मान मिळाल्याचे कौतूक आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. जिल्हय़ातील सीसीटीव्ही सनियंत्रण योजनेचे मंगळवारी गृहमंत्री देशमुख यांच्या हस्ते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या सोहळय़ास खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम हे जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये, तर आमदार दीपक केसरकर, आमदार नीतेश राणे यांच्यासह सर्व नगराध्यक्ष, पोलीस ठाण्यांचे प्रमुख हे ऑनलाईन उपस्थित होते.
जिल्हय़ाचे आजी व माजी दोन्ही पालकमंत्र्यांनी चांगले काम केल्याचे सांगून गृहमंत्री पुढे म्हणाले, गुन्हेगारी कमी करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे उपयुक्त आहेत. सध्याच्या कोरोनाच्या काळात जिल्हय़ातील पोलीस दल, महसूल यंत्रणा, आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. त्यांच्या कामाचे कौतुक असल्याचेही ते म्हणाले.
पालकमंत्री सामंत म्हणाले, डीपीडीसीमधून मिळालेल्या निधीचा सदुपयोग जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चांगल्या प्रकारे केला आहे. ही यंत्रणा जिल्हय़ासाठी नक्कीच वरदान ठरणार आहे. गुन्हेगारी कमी करण्यासोबतच यामुळे जिल्हय़ाच्या विकासालाही चालना मिळणार आहे.
खासदार राऊत यांनी पोलीस दलाचे अभिनंदन केले. आमदार केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्ममातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे सांगितले. आमदार राणे यांनीही यावेळी पोलीस दलाचे अभिनंदन केले व अशा चांगल्या कामांमध्ये सर्वांनी एकत्र काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाधिकारी म्हणाल्या, या प्रकल्पामुळे जिल्हय़ातील महिला अधिक सुरक्षित होतील.
पोलीस अधीक्षक गेडाम यांनी स्वागत केले. ते म्हणाले, यापूर्वी अडीच कोटी रुपये खर्चून 52 ठिकाणी 158 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. त्यानंतर आता 5 कोटी खर्च करून 93 ठिकाणी 280 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. संपूर्ण जिल्हा सीसीटीव्ही कॅमेरे कव्हरेजमध्ये आला आहे. सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कुलकर्णी यांनी केले.
आमदार राणेंकडून आमदार केसरकर यांचे विशेष आभार
आमदार राणे या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, जिल्हय़ात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात माजी पालकमंत्री केसरकर यांचा मोठा वाटा आहे. त्यांचे आपण विशेष आभार मानतो. जिल्हा नियोजनमधून त्यांनी निधी दिला, त्याचा मी साक्षीदार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे जिल्हय़ात बसवले गेल्यामुळे जिल्हय़ातील नागरिक आणि येणाऱया पर्यटकांची सुरक्षितता वाढणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.