शहरातील व्यापार्यांची स्पष्टोक्ती : संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाला यश : महापुरूषांच्या नावाने तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस कायम विरोध करणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवपुत्र, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने असलेल्या संभाजी बिडीच्या खरेदी आणि विक्रीला संभाजी ब्रिगेडच्या वतीने कडाडून विरोध करण्यात आला. त्यासाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला यश आले असून शहरातील व्यापार्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संभाजी बिडीची खरेदी आणि विक्री करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
जिल्हा पानपट्टी असोसिएशन यांनीसुद्धा इथून पुढे संभाजी बिडीची खरेदी विक्री करणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर विक्रीसाठी असलेला सुमारे दहा लाभ रूपयांच्या बिडय़ा संबंधित कंपनीला परत पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आला. व्यापारी आणि विक्रेत्यांच्या या निर्णयाचे संभाजी ब्रिगेडचे स्वागत केले असून यापुढे महापुरूषांच्या नावाने कोणताही तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी दिला आहे.
याबाबत माहिती देताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी सांगितले, छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय महापुरुष आहेत. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवन काळामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यसन केले नाही आणि त्याच महापुरुषाच्या नावाने कोणी तंबाखूजन्य पदार्थ विकत असेल तर ही गोष्ट अत्यंत खेदजनक आहे. याविरोधात संभाजी ब्रिगेडने आंदोलन छेडल्यानंतर कोल्हापूर जिह्यातील व्यापारी वर्गाने याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्याकडे शिल्लक माल सुद्धा कंपनीला परत पाठवण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनात विकी जाधव निलेश सुतार अभिजीत कांजर, अभिजीत भोसले, मदन परीट, उमेश जाधव, शहाबाज शेख, प्रवीण काटे आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
तीन बॉक्स आहेत, ब्लॅकने विकतो
संभाजी ब्रिगेडच्या या आंदोलनात एका व्यापाऱयाने कार्यकर्त्यांना सांगितले, साहेबांना मॅनेज करा, पावती फाडतो, तीन बॉक्स बिडय़ा आहेत, त्या ब्लॅकने विकतो, असे सांगितल्यावर कार्यकर्ते भडकले. त्यांनी आम्ही ब्रिगेडचे वाघ आहोत, छत्रपती संभाजी महाराज आमची अस्मिता आहेत, जो जो डिवचेल त्याला ठोकले जाईल, असा इशारा दिल्यानंतर तो व्यापारी गयावया करू लागला. बिडीची विक्री न करण्याचा निर्णय त्यानेही मान्य केला.