प्रतिनिधी / कुरुंदवाड
शिरोळ तालुक्यातील वैद्यकीय, पोलीस, महसूल व नागरिकांच्या सहकार्याने तालुका कोरोनामुक्त झाला आहे. संभाव्य पूरस्थिती उद्भवल्यास जनावरे व कुटुंबांचे स्थलांतर करणे गरजेचे असून पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. मागील महापुराच्या आपत्तीमधील कोणतीही व्यक्ती शासकीय अनुदानापासून वंचित राहणार नाही. असे आश्वासन राज्याचे आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
कोरोना व संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर उपाय व योजनांची आढावा बैठक येथील नगर परिषदेच्या सभागृहात घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ नेते व नगरसेवक रामचंद्र डांगे होते.
यावेळी बोलताना ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले की, देशात कोरोना या महामारीने थैमान घातले असूनही शिरोळ तालुक्यात वैद्यकीय विभाग, पोलीस, महसूल व नागरिकांच्या सहकार्याने तालुका कोरणा मुक्त झाला आहे. पावसाळा सुरू होत असून संभाव्य महापूर उद्भवल्यास कोणतीही हानी होऊ नये म्हणून तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन दल तैनात करण्यात येणार आहे. तर नावाची दुरुस्ती झाली असून यांत्रिक बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. महापुराचे संकट आल्यास जनावरे व कुटुंबांना तात्काळ स्थलांतर करण्यास प्राधान्य देण्यात यावे व त्यांना तेरवाड,अकिवाट, सैनिक टाकळी या ठिकाणी स्थलांतर करून त्या ठिकाणी जनावरांची छावणी तयार करून त्यांना वैरण उपलब्ध करून द्यावी.
वैद्यकीय विभागात औषधांचा साठा उपलब्ध करून ठेवला पाहिजे तर वीज वितरण कंपनीने लोंबकळणाऱ्या तारा व ट्रान्सफॉर्मर उंचीवर करण्याच्या सूचना वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना केल्या असून मागील महापुरात ज्यांच्या घराची पडझड होऊनही त्यांना अनुदान मिळाले नाही त्यांचे फेर सर्वे करण्याचे तहसीलदार यांना सूचना करणार आहे. कोरोनाचे संकट अजून टळले नसून खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी आपली सेवा सुरू करावी. तर सकाळी नऊ ते सायंकाळी 5 शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत भाजीपाल्याचे लिलाव सुरू करून व्यापारही सुरक्षित अंतर ठेवून सुरु करावा अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
यावेळी मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी संभाव्य महापुराच्या योजनांची माहिती दिली. येथील नगरपरिषदेचा विकास आराखडा, प्रलंबित पाणी पुरवठा योजना, रस्ते, गटारी याविषयी नागरिकांनी तक्रारी ना. यड्रावकर यांच्यासमोर मांडल्या या सर्व मागणीचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिले.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पाणीपुरवठा सभापती डॉ. सुनील चव्हाण यांनी केले ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा सत्कार नगराध्यक्ष जयराम पाटील व ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांच्या हस्ते करण्यात आला. या सभेला अक्षय आलासे, जवाहर पाटील, उदय डांगे, अनुप मधाळे, किरण सिंह जोंग, बापू जोंग, फारूक जमादार, दयानंद मालवेकर, धनपाल आलासे, रमेश भुजुगडे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, वैद्यकीय अधिकारी रेश्मा तराळ, आप्पासाहेब भोसले, राजू आवळे, तानाजी आलासे, बाबासाहेब भबिरे, बाबासाहेब भुजूगडे, प्रफुल्ल पाटील, अभय पाटुकले या मान्यवरांसह विविध पक्ष्यांचे, संस्थांचे, मेडिकल असोसिएशन पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.