वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचा तान्हाजी चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्पन्नाचे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. विशेष बाब म्हणजे देशाच्या तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखांनी हा चित्रपट एकत्रितपणे पाहिला आहे. रविवारी संध्याकाळी सैन्यप्रमुख मनोज नरवणे, नौदलप्रमुख करमवीर सिंग आणि वायुदलप्रमुख राकेश कुमार सिंग भदौरिया यांनी नवी दिल्लीच्या सिनेमाहॉलमध्ये या चित्रपटाचा आनंद घेतला आहे.
तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखांनी अजय देवगणसोबत छायाचित्रेही काढून घेतली आहेत. नौदलाचे माजी अधिकारी हरिंदर सिक्का यांनी ही छायाचित्रे प्रसारित केली आहेत. सैन्यप्रमुखांसोबत वेळ घालविण्याची संधी मिळणे गौरवास्पद आहे. तान्हाजी चित्रपटाला मिळालेल्या प्रेमासाठी सर्वांचे आभार, असे अजय देवगणने म्हटले आहे.
तान्हाजी हा चित्रपट 1670 मध्ये सिंहगड किल्ल्याशी संबंधित लढाईवर आधारित आहे. या लढाईत तान्हाजी मालुसरे यांनी दाखविलेले साहस कित्येक पिढय़ांना प्रेरणादायी ठरणारे आहे. अभिनेता या नात्याने अजय याचा हा 100 वा चित्रपट आहे. चित्रपटात त्याने वीरयोद्धा तान्हाजी यांचीच भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 160 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे.